वर्धा येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वास्तव्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने, तसेच २०१८ मध्ये गांधीजींची शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती साजरी होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर वर्धा येथील सेवाग्राम आश्रम परिसराचा विकास आराखडा सर्वसहमतीने अंतिम करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यात येईल, तसेच येत्या दोन ते तीन महिन्यांत आश्रम परिसराच्या विकासाचे काम सुरु होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत दिली.
महात्मा गांधीजींचे तत्वज्ञान आणि स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या योगदानाचा अभ्यास करण्यासाठी देश-विदेशातील विद्यार्थी तसेच पर्यटक सेवाग्राम आश्रमाला आणि परिसराला भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात. या सर्वांच्या सोयीसाठी तसेच गांधीजींच्या कार्याला अभिवादन करुन कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यावर्षी राज्याच्या अर्थसंकल्पात सेवाग्राम विकास आराखड्यासाठी ३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापेक्षा अधिक निधीची गरज लागली, तर तीदेखील पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास पवार यांनी या बैठकीत दिला.
पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्र मुळक, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव के. पी. बक्षी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, नागपूरचे विभागीय आयुक्त गोपाळ रेड्डी, वर्ध्याचे जिल्हाधिकारी नवीन सोना, सेवाग्राम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, कार्यवाह डॉ. श्रीरामल जाधव आदींसह सेवाग्राम प्रतिष्ठानचे प्रतिनिधी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.