पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेला कुख्यात गुंड साहील काळसेकर याला पुन्हा पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
खून, मारामाऱ्या, खंडणी उकळणे अशा विविध प्रकारच्या २८ गंभीर गुन्ह्य़ांप्रकरणी हव्या असलेल्या काळसेकरला सुमारे १५ दिवसांपूर्वी पोलिसांनी येथील मिरजोळे परिसरात पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसांवर प्राणघातक हल्ला चढवला होता. पण थोडय़ाच वेळात त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले. जखमी अवस्थेत साहीलला येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते, पण तेथून त्याने पोलिसांची नजर चुकवून पलायन केले. त्यानंतर गेले दोन आठवडे पोलीस त्याच्या मागावर होते.
रत्नागिरीतून पळालेल्या साहीलने मोटारसायकलवरून थेट मुंबई गाठली. तेथील डोंगरी भागात तो मित्रांकडे वास्तव्यास होता. या काळात दररोज सीमकार्ड बदलून बोलण्याचे तंत्र त्याने अवलंबले होते. पण कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांना येणाऱ्या फोनवर लक्ष ठेवून पोलिसांनी त्याचा माग काढला. मंगळवारी रात्री तो देवरूखजवळ येणार असल्याची माहिती मिळाल्यामुळे चिपळूणचे पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह देवरुख-मार्लेश्वर रस्त्यावरील हॉटेल गिरीराजजवळ सापळा रचला आणि मध्यरात्रीच्या सुमारास त्याला जेरबंद करण्यात यश मिळवले. त्या वेळीही साहीलने पोल्सिांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण तो असफल ठरला.