19 October 2019

News Flash

‘मिस इंडिया एनिग्मा’च्या घरी कुख्यात सुमित ठाकूर सापडला

सुमित ठाकूर हा मिस इंडिया एनिग्मा स्पध्रेची विजेती असलेली उर्वशी अरविंद साखरे हिच्या बंगल्यात सापडला

अटक करण्यात आल्यानंतर बुरख्यातील सुमित ठाकूर व पोलीस अधिकारी व कर्मचारी.

 

गोळीबार व खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्य़ात फरार होता

नागपूर :कुख्यात गुंड व गोळीबार करून खुनाच्या प्रयत्नात फरार असलेला आरोपी सुमित ठाकूर हा मिस इंडिया एनिग्मा या स्पध्रेची विजेती असलेली उर्वशी अरविंद साखरे हिच्या बंगल्यात सापडला. त्याला गुन्हे शाखेने शुक्रवारी सायंकाळी ७ च्या सुमारास बेडय़ा ठोकल्या. याप्रकरणी पोलिसांनी उर्वशी साखरे हिच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे.

२६ जूनला कुख्यात गुंड कुलदीप ऊर्फ पिन्नू पांडे याच्यावर पेन्शननगरमध्ये गोळीबार करण्यात आला होता. त्यावेळी त्याच्यासह इतर दोन नागरिकांना गोळ्या लागल्या होत्या. या प्रकरणात पोलिसांनी खुनाचा प्रयत्न आणि शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली होती. गोळीबार करवणारा कुख्यात सुमित ठाकूर, नौशाद, इरफान चचा ऊर्फ बंदुकीया हे फरार होते. त्यापैकी गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंशा चौकात सुमितची प्रेयसी उर्वशी साखरे राहत असल्याची माहिती होती.

तिच्या घरावर पोलीस लक्ष ठेवून होते. आज शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उर्वशीच्या घराची झडती घेतली. त्यावेळी उर्वशीच्या बेडरूममध्ये सुमित सापडला. याची माहिती   तिच्या आईवडिलांना नव्हती.

वेशभूषा बदलून पाळत

सुमित हा प्रेयसीच्या घरी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारावर पोलीस वेशभूषा बदलून उर्वशीच्या घरावर नजर ठेवून होते. दोन दिवसांपूर्वी तो उर्वशीच्या घरात शिरताना पोलिसांना दिसला. मात्र, त्यानंतर तो बाहेर पडलाच नाही. त्यामुळे पोलीस त्याच्या घराबाहेर पडण्याची वाट बघत होते.

कपाटात लपवून ठेवले

सुमित हा घराबाहेर पडत नसल्याने पोलिसांना तो अचानक कुठे बेपत्ता झाला, हे समजायला मार्ग नव्हता. शेवटी पोलीस अधिकारी  व कर्मचाऱ्यांनी घराला घेराव घालून आतमध्ये प्रवेश केला. त्यावेळी उर्वशीचे आईवडील घरी बसले होते. त्यांनी अशी कुणी व्यक्ती घरात नसल्याचे सांगितले. मात्र, उर्वशीच्या शयनकक्षाची झडती घेत असताना एका कपाटात सुमित लपून असल्याचे आढळले. त्यावेळी उर्वशी शयनकक्षातच होती, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

 

 

First Published on August 4, 2018 4:13 am

Web Title: absconding gangster sumit thakur found in enigma miss india home