समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करणाऱ्या राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या कुटुंबातील असल्याचा तरी किमान मान राखावा, राजकारणासाठी आता त्याच भाजपासमोर गुडघे टेकू नये, असं आझमी यांनी म्हटलं आहे. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच मात्र आझमींनी यावेळी भरभरून कौतुक केलं आहे. भाजपाला रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे हात बळकट केले पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे. नागपूर येथे ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी आझमी राज ठाकरे यांच्याबाबत बोलताना म्हणाले की, त्यांच्याकडे काहीच न उरल्याने ते बिचारे उदास आहेत. ते कधी भाजपाला शिव्या देतात, लोकसभा निवडणुकीच्या काळात सभांद्वारे त्यांनी भाजपाविरोधात किती मोठं अभियान चालवलं होतं. विविध आवाज काढून त्यांनी टीका केली होती. मात्र, यानंतर जेव्हा त्यांनी विधानसभा निवडणुक लढवली तेव्हा त्याचा केवळ एकच उमेदवार विजयी झाला. आता शिवसेना पुढे जात आहे, शिवसेनेचा आज मुख्यमंत्री बनल्याने ते कुठं जावं या विचाराने त्रस्त आहेत. अखेर ते भाजपाकडे जात आहेत. बाळासाहेबांच्या परिवारातील राज ठाकरे आहेत, किमान त्यांनी त्याचा तरी मान राखावा. गुडघे टेकून त्यांच्याकडे जातील, मला भीती आहे की यातुन ते गुडघे दुखीचे रुग्ण होऊ नये. मी त्यांना सल्ला देऊ इच्छितो की एकाच मार्गावर रहा, जीव गेला तरी शब्द मोडू नये. रोजरोज प्रशंसा करा, शिव्या द्या असं वागणं ठीक नाही.

उद्धव ठाकरे हे चांगले व्यक्ती, भाजपाला रोखण्यासाठी त्यांना बळ द्या –
राज्यातील नागरिकांनी आनंदी व्हायला हवं की, भाजपाला सोडून उद्धव ठाकरे सारख्या व्यक्तीने एक नवी विकासआघाडी निर्माण केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल आहे की, एनआरसीमुळे मी एकाही व्यक्तीला त्रास होऊ देणार नाही. फडणवीस यांनी सुरू केलेले डिटेंशन कॅम्प उद्धव ठाकरे यांनी बंद केले. जे लोक देशाचे धर्माच्या नावावर विभाजन करू इच्छित आहेत, त्यांच्याविरोधात जर उद्धव ठाकरे बोलतील तर मला आनंद आहे. मी त्यांच्याबरोबर उभा आहे. मी आतापर्यंत त्यांच्याबरोबर नव्हतो, त्यांना कधी भेटलो देखील नाही. परंतु जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा मला वाटले की ते चांगले व्यक्ती आहेत. मी आज हे देखील सांगतो की, उद्धव ठाकरे यांना बळ द्या, जेणेकरून भाजपाची वाढती ताकद रोखता येईल, असे देखील आझमींनी यावेळी बोलून दाखवले.