औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या शुल्कात वाढ केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने सातपूर येथील संस्थेच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. राज्य शासनाने आयटीआयच्या प्रवेश शुल्कात केलेली वाढ अन्यायकारक असून, सर्वसामान्य विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. आयटीआयमुळे कमी कालावधीत व्यावसायिक शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहणारे हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य या निर्णयामुळे अंधारात आले असल्याचे अभाविपने म्हटले आहे. अतिशय कमी शुल्कात होणारे हे शिक्षण यावर्षी २३०० ते २८०० रुपयांपर्यंत महाग झाले आहे. विकास शुल्काच्या नावे एक हजार रुपये शुल्क घेणे चुकीचे आहे. अशा प्रकारची शुल्कवाढ शासनाने तत्काळ रद्द करावी व विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर करावा, अशी मागणी अभाविपने केली आहे.