प्रबोध देशपांडे

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाच्या कामामागे लागलेली अडथळय़ांची मालिका आता थांबण्याची चिन्हे आहेत. विविध संकटांवर मात केल्यानंतर या कामासाठी पुन्हा निविदा प्रक्रिया राबवून तीन कंपन्यांना कंत्राट देण्यात आले आहे. त्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्णत्वाकडे येत असल्याने येत्या एक ते दीड महिन्यात नव्याने कामाचा ‘श्रीगणेशा’ होण्याची शक्यता वरिष्ठ सूत्रांनी व्यक्त केली.

article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व – परीक्षास्वरूप आणि अभ्यासक्रम
mining projects in sindhudurg
सिंधुदुर्गातील खनिज प्रकल्प कायमचे बंद व्हावेत; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पर्यावरणवाद्यांना अपेक्षा
national pension scheme marathi news
मार्ग सुबत्तेचा : राष्ट्रीय निवृत्ती योजना (एनपीएस): फायदे आणि तोटे
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

अमरावती ते नवापूपर्यंतचा (गुजरात राज्याची हद्द) ४८०.७९ कि.मी. लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम विविध कारणांमुळे २०१३ पासून सातत्याने रखडले आहे. अमरावती ते चिखली (नांदुरा अगोदरचे गाव) १९४ कि.मी. आणि फागणे ते नवापूर १४०.७९ कि.मी. अशी कामाची विभागणी झाली आहे. अमरावती ते चिखलीपर्यंतचे २२८८.१८ कोटी रुपयांचे कंत्राट ‘आयएल अ‍ॅण्ड एफएस’ अंतर्गत असलेल्या ‘आयटीएनएल’ कंपनीकडे होते.

डिसेंबर २०१७ पासून सहा महिन्यांच्या कालावधीत सरासरी २२ टक्के कामही झाले. ‘आयएल अ‍ॅण्ड एफएस’ आर्थिक डबघाईस आल्याने काम बंद पडले. अडीच वर्षांपासून काम अर्धवट अवस्थेत आहे. मार्गाची वारंवार दुरुस्ती करून त्यावरून वाहतूक सुरू आहे.

अडचणीतील मार्गाचे काम नव्याने सुरू करण्यासाठी ‘बीओटी’ऐवजी ‘हायब्रीड अ‍ॅन्युटी’ तत्त्वावर करण्याचा निर्णय झाला. केंद्र शासनाच्या विविध पातळीवरील समित्यांकडून त्याला मंजुरी मिळाली. या कामाचा खर्च ४० टक्के केंद्र शासन, तर ६० टक्के कंत्राटदार कंपनी उचलणार आहे. केंद्र शासन पुढील १५ वर्षांच्या काळात प्रत्येक सहा महिन्यांच्या टप्प्यात कंत्राटदार कंपनीचा त्यांचा वाटा अदा करणार आहे. अमरावती ते चिखली १९४ कि.मी.च्या कामाची चार भागांत विभागणी करून साधारणत: ४५ ते ५५ किमीचा प्रत्येक टप्पा करण्यात आला. या कामाची निविदा प्रक्रिया झाली. पहिल्या दोन टप्प्यांसाठी राजपथ इन्फ्रा, तिसऱ्या टप्प्यासाठी ‘मोन्टे कॉर्लो’ व चौथ्या टप्प्यासाठी कल्याण टोल्सची सर्वात कमी दराने निविदा प्राप्त झाल्याने त्यांना काम देण्यात आले आहे.

तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर एप्रिल महिन्यापासून पुन्हा काम सुरू होण्याची अपेक्षा असतानाच करोनाच्या आपत्तीमुळे हे काम आणखी आठ महिन्यांसाठी लांबणीवर पडले. टाळेबंदीमुळे प्रक्रिया ठप्प झाल्याने कामाला दिरंगाईचा सामना करावा लागला. आता मात्र पुन्हा एकदा कामाने गती घेतली. या कामासाठी कंत्राटदारांनी स्वतंत्र कंपनीची स्थापना करून त्या कंपनीच्या नावाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) सोबत करारनामे केले आहेत. ‘फायनान्शियल क्लोज’ होणे अद्याप बाकी आहे. यामध्ये कंत्राटदारांनी बँकांकडून प्रकल्पासाठी कर्ज स्वरूपात निधी उपलब्ध करून घेण्याच्या प्रक्रियेचा समावेश असतो. त्यासाठी करारनाम्यानंतर १५० दिवसांची मुदत असते. राजपथ इन्फ्राची २९ डिसेंबर, ‘मोन्टे कॉर्लो’ची २९ नोव्हेंबर व कल्याण टोल्सची १५ डिसेंबपर्यंत ‘फायनान्शियल क्लोज’ची मुदत आहे.

कंत्राटदारांनी बँक हमी दिल्यावर ‘अपॉइंटमेंट डेट’ देण्यात येईल. त्यानंतर नोव्हेंबरच्या दुसऱ्या किंवा डिसेंबरच्या पहिल्या पंधरवाडय़ात चौपदरीकरणाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होण्याचा अंदाज आहे. ‘फायनान्शियल क्लोज’च्या अंतिम मुदतीच्या आत प्रक्रिया पूर्ण झाल्यास त्याअगोदरही कामाला प्रारंभ होऊ शकतो.

प्राथमिक तयारीला प्रारंभ

महामार्ग चौपदरीकरणाचे काम नव्याने सुरू करण्यापूर्वी कंत्राट मिळालेल्या कंपन्यांनी प्राथमिक तयारीला प्रारंभ केला आहे. साफसफाई, यंत्रसामुग्री, कच्चा माल तयार करण्यासाठी प्रकल्पाची मंजुरी, प्रकल्पाची उभारणी, कामगारांची उपलब्धता आदी कार्याला सुरुवात झाली आहे.

दोन वर्षांत काम पूर्ण

महामार्गाचे काम करण्यासाठी कंत्राटदार कंपन्यांना ‘अपॉइंटमेंट डेट’पासून दोन वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे. या कालावधीत चौपदरीकरण पूर्ण होईल. मार्गातील तीन टोल नाक्यांवर वसुलीचे अधिकार ‘एनएचएआय’कडेच राहतील. देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी मात्र कंत्राटदार कंपनीची राहणार आहे.

‘हायब्रीड अ‍ॅन्युटी’ तत्त्वावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. तांत्रिक प्रक्रिया सुरू असून लवकरच कामाला प्रारंभ होईल.

– विलास ब्राह्मणकर,  प्रकल्प संचालक

तथा महाव्यवस्थापक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण.

महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गत अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. केंद्र शासनाच्या अखत्यारित असल्याने त्याची माहिती उपलब्ध होत नाही. लवकरात लवकर याचे काम मार्गी लागावे.

– गोपीकिशन बाजोरिया, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्था.