राज्यात ज्या ज्या ठिकाणी निवडणुका होत आहेत, त्या त्या ठिकाणी लोकांनी भाजपचा पैसा लुटावा, असे वादग्रस्त विधान भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. अकोल्यातील एका पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

आगामी निवडणुकांमध्ये डावे वगळता कोणत्याही राजकीय पक्षांसोबत युती करणार नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. काही समविचारी पक्षांसोबत युती करणार असल्याचे यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

याआधी गेल्याच महिन्यात रावसाहेब दानवे यांनी मतदारांना लक्ष्मीदर्शन घेण्याचा सल्ला होता. ‘मतदानाच्या आदल्या रात्री लक्ष्मी घरात येते. तिला नाकारु नका. तिचे स्वागत करा,’ असे दानवे यांनी म्हटले होते. यानंतर निवडणूक आयोगाने रावसाहेब दानवे यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले होते. दानवे यांच्या स्पष्टीकरणाने समाधान न झाल्याने  निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई केली होती. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकरांवरही निवडणूक आयोग कारवाई करण्याची शक्यता आहे.