संघाचा राष्ट्रवाद बहुसंख्य लोकांना मान्य नाही. बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद संघाचा राष्ट्रवाद होईपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल. कारण संघाचा राष्ट्रवाद संकुचित आहे. बाबासाहेबांची प्रतिमा न स्वीकारता बाबासाहेबांचा राष्ट्रवाद स्वीकारावा. संघाने बाबासाहेब किती पचवले हाही एक प्रश्नच आहे, की ते एक संघाचे नाटक आहे. संघाचा राष्ट्रवाद मुस्लीम आणि बहुजन स्वीकारणार नाहीत. कारण गोळवलकर जातीवादी होते. त्यांनी जातीचे नेहमीच समर्थन केले. संघ समाजवादी झाल्यास समाजवादी संघाबाबतची वैचारिक मतभिन्नताही संपेल, असे प्रतिपादन अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केले.
कणकवली शहरात आयोजित करण्यात आलेल्या ‘जयभीम’ महोत्सवासाठी डॉ. सबनीस आले असता त्यांनी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्यांवर आणि बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद नाकारून संघाचा राष्ट्रवाद लादू पाहणाऱ्यांवर सडकून टीका केली. यावेळी जयभीम महोत्सवाचे संयोजक उत्तम पवार, सुधीर तांबे, राजेश कदम, सिद्धार्थ तांबे आदी उपस्थित होते.डॉ. सबनीस म्हणाले, बेळगावसह संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभारण्यात आला. यात बेळगाव-कारवारच्या १४ जणांनी आपले प्राण गमावले. हे बलिदान महाराष्ट्राचे तुकडे पाडण्यासाठी दिले गेले काय? याची जाणीव आधी वेगळा विदर्भ मागणाऱ्यांनी ठेवावी आणि मगच वेगळ्या विदर्भाची मागणी करावी. आजही ‘बेळगावसह महाराष्ट्र’ यासाठी लढा चालू आहे. पण बेळगावचा प्रश्न कोर्टाच्या बाहेर बसून मिटवायला पाहिजे होता. बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र लढा अपूर्ण हा महाराष्ट्र सरकारचा नाकर्तेपणाच आहे. महाराष्ट्राचे तुकडे कोणी आणि कधीही पाडू नये. संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात बेळगाव-कारवारचे १४ हुतात्मे गेले. तरीही संयुक्त महाराष्ट्राचा लढा अपूर्ण आहे. हा सरकारचा नाकर्तेपणा आहे. बेळगावचा प्रश्न कोर्टाच्या बाहेर बसून मिटवायला हवा. संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी नागपूर करार झाला. तो विदर्भाला न्याय देण्यासाठीच. म्हणूनच तिथे दुसरे विधान भवन झाले. पण दुर्दैवाने विदर्भाची वैधानिक विकास मंडळे झोपली आहेत. विदर्भाचे अनेक मुख्यमंत्री झाले. पण पश्चिम महाराष्ट्राचेच वर्चस्व राहिले. त्यामुळेच विदर्भ-मराठवाडा दुष्काळी भाग राहिला. पण हा राजकीय इच्छाशक्तीचा दुष्काळ आहे. वेगळ्या विदर्भाची मागणी मूठभर लोकांची आहे. या मागणीला विदर्भातील कलाकारांचा विरोध आहे. संघाने आता बुद्ध स्वीकारावा. पण तो त्यांना पचेल का? संघाने बुद्ध आणि आंबेडकर स्वीकारणे कठीणच. पुरोगामी संघटना संघापासून दूर. पण पुरोगामी संघटनांमध्ये फूट आहे. आरपीआयमध्येच ४० संघटना आहेत. याचा विचार पुरोगाम्यांनी करावा. भारतात विवेकी लोकांची संख्या जास्त आहे. पण डाव्या विचाराचे लोक घोटाळे जास्त करतायत. अण्णा भाऊ साठेंचे नाव घेऊन घोटाळे करणारे इथे आहेत. शिवाजीच्या नावाचे दुकान थाटणारे जातीवादी आहेत, असेही शेवटी डॉ. सबनीस म्हणाले.