गुजरातमध्ये काँग्रेसला अनुकूल परिस्थिती असून तिथे काँग्रेसला अच्छे दिन येतील, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्तवले आहे. गुजरातमध्ये काँग्रेससोबत आघाडी करण्याबाबत चर्चा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

गडचिरोलीत बुधवारी शरद पवार यांनी जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. ‘मी लाभार्थी’ म्हणून मोठमोठ्या जाहिराती दिल्या जात आहेत. पण त्यात कर्जमाफीचे किती लाभार्थी आहेत, हे कळलेले नाही, असा टोला त्यांनी लगावला. नागपूरमध्ये हत्यांचे प्रमाण वाढत आहे. सांगलीतील एका तरुणाच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनाच अटक करण्यात आली. या घटना धक्कादायक आहेत. हे कायद्याचे राज्य आहे का?, असे पवार म्हणालेत. राज्यात ज्या घटना घडतात त्यावर मुख्यमंत्र्यांची गृहमंत्री म्हणून मी एकही प्रतिक्रिया ऐकलेली नाही, असे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.

केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने देशभरात गोरक्षकाचा सुळसुळाट झाला असून यामुळे दलित आणि मुस्लिमांना असुरक्षित वाटत असल्याचा दावा पवारांनी केला. राष्ट्रीय कृषी विकासाचा दर फक्त ३ टक्के असून केंद्र सरकार याबाबत दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला. लोकशाहीच्या माध्यमातून जनतेने स्वतंत्र विदर्भाची मागणी लावून धरली तरच त्यांना पाठिंबा देऊ असे त्यांनी सांगितले.

आबांची आठवण
गडचिरोलीतील सभेत शरद पवारांनी दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील यांची आठवणही सांगितली. गडचिरोली हा हैदराबाद व महाराष्ट्राला जोडणारा जिल्हा असून या जिल्ह्याचा अजूनही विकास झालेला नाही. दळणवळणाची सुविधाही चांगली नाहीत. याची जाणीव आर आर पाटील यांना झाली आणि त्यांनी स्वतःहून गडचिरोलीचे पालकमंत्रीपद मागितले होते, असे पवार यांनी नमूद केले. गडचिरोलीत कायदा व सुव्यवस्थेचा मुख्य प्रश्न असल्याचे नेहमी सांगितले जाते. पण मला त्यापेक्षा आर्थिक कारण महत्त्वाचे वाटते. आर आर पाटील यांनीही त्यावरच काम केले होते, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.