06 March 2021

News Flash

घातवार!

* उर्से नाक्याजवळ दुभाजक तोडून टेम्पोची धडक, * अक्षयचा दोन वर्षांचा मुलगाही मृत्युमुखी * मराठी चित्रपट-नाटय़सृष्टीवर शोककळा प्रसिद्ध अभिनेते आनंद अभ्यंकर (५०) यांच्या मोटारीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या टेम्पोने

| December 25, 2012 04:48 am

* उर्से नाक्याजवळ दुभाजक तोडून टेम्पोची धडक,
* अक्षयचा दोन वर्षांचा मुलगाही मृत्युमुखी
* मराठी चित्रपट-नाटय़सृष्टीवर शोककळा
प्रसिद्ध अभिनेते आनंद अभ्यंकर (५०) यांच्या मोटारीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या टेम्पोने रस्ता दुभाजक ओलांडून ठोकर दिली. त्यात अभ्यंकर यांच्यासह तरुण अभिनेता अक्षय पेंडसे (३३) व त्यांचा दोन वर्षांचा मुलगा प्रत्युष याचाही मृत्यू झाला, तर अक्षयची पत्नी दीप्ती (३०) व मोटारीचा चालक किरकोळ जखमी झाले आहेत. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोलनाक्याजवळ रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास अपघात झाला. या प्रकरणी टेम्पोचालकाला अटक करण्यात आली आहे. या दोन्ही अभिनेत्यांच्या अपघाती मृत्यूमुळे मराठी चित्रपट व नाटय़सृष्टीवर शोककळा पसरली.
मोटारीचा चालक सुरेश जगदीश पाटील किरकोळ जखमी आहे. अभ्यंकर व पेंडसे मूळचे पुण्याचे होते. ‘कोकणस्थ’ या आगामी मराठी चित्रपटाचे काम पुण्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. चित्रीकरण संपल्यानंतर सर्व जण रविवारी रात्री अभ्यंकर यांच्या डहाणूकर कॉलनी येथील घरी गेले. त्या ठिकाणी जेवण झाल्यानंतर अभ्यंकर, त्याच्या मोटारीचा चालक, पेंडसे पती-पत्नी आणि त्यांचा मुलगा प्रत्युष असे मुंबईला निघाले. त्या वेळी अभ्यंकर हे मोटार चालवीत होते, तर त्यांचा चालक शेजारी बसला होता. त्यांच्या पाठीमागे पेंडसे कुटुंबीय बसले होते. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर रात्री साडेअकराच्या सुमारास ते उर्से टोलनाक्याजवळ पोहोचले. त्या वेळी मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या टेम्पोच्या चालकाचा ताबा सुटल्यामुळे टेम्पो रस्ता दुभाजक तोडून विरुद्ध लेनमध्ये आला आणि अभ्यंकर यांच्या मोटारीला येऊन धडकला. या धडकेत अभ्यंकर यांच्या मोटारीची एक बाजू पूर्णपणे चेपली गेली. या अपघातात अभ्यंकर व पेंडसे यांच्या डोक्याला, छातीला गंभीर जखमा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. प्रत्युष व इतर तिघांना उपचारासाठी चिंचवड येथील लोकमान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रत्युषच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दीप्ती व पाटील यांना किरकोळ मार लागला होता. या प्रकरणी वडगाव-मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, टेम्पो चालक श्रीमंत लहू मेळे (३५, रा. उमरगा) याला अटक करण्यात आली आहे.
अभ्यंकर व पेंडसे यांच्या मृत्यूची बातमी समजताच अनेक मराठी कलाकारांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. अभ्यंकर यांचा मृतदेह डहाणूकर कॉलनीतील त्यांच्या घरी अन्त्यदर्शनासाठी ठेवला होता. अभ्यंकर यांनी अनेक मराठी चित्रपट व मालिकांमध्ये काम केले आहे. ‘बालगंधर्व’, ‘मातीच्या चुली’, ‘आनंदाचे झाड’, ‘स्पंदन’, ‘आयडियाची कल्पना’ या मराठी चित्रपटात, तर ‘वास्तव’ व ‘जिस देश में गंगा रहता है’ या हिंदी चित्रपटात त्यांनी काम केले होते.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2012 4:48 am

Web Title: accident
Next Stories
1 गावोगावच्या लालबोंडय़ा निवडुंगाला घरघर
2 ‘आनंदसाहेब, उठले ते परत आलेच नाहीत!’
3 कुटुंबातली मंडळी गमावल्याचे दु:ख नाना पाटेकर यांची भावना
Just Now!
X