मुंबई-गोवा महामार्गावर लांज्याजवळ मंगळवारी सकाळी झालेल्या अपघातांत परळ येथील तिघेजण तर पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर पनवेलजवळ अंधेरीचे दोनजण मृत्युमुखी पडले.

मुंबई-गोवा महामार्गावर वाकेड घाटात लांज्याजवळ मंगळवारी सकाळी एका खासगी बसवर कार आदळून कारमधील तिघेजण ठार, तर दोघे जखमी झाले आहेत. एका वाहनाला मागे टाकून पुढे जाण्याच्या नादात ही कार समोरून येणाऱ्या बसवर आदळल्याचे समजते. शक्ती बाबाजी रेडकर (वय २५), साई बाबाजी रेडकर (२८) आणि रत्नप्रभा आचरेकर (सर्व रा. सुदर्शन बिल्डिंग, परळ, मुंबई) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. कारमधील रेश्मा बाबाजी रेडकर (५४) आणि मधुकर गोविंद आचरेकर (८२) या दोघा जखमींवर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर पनवेलजवळील कोन गावालगत मंगळवारी सायंकाळी झालेल्या अपघातामध्ये मुंबईचे दोघे ठार झाले असून, इतर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. जुनेद (२३) व उमेर (५३) अशी मृतांची नावे असून ते अंधेरी येथे राहाणारे होते.  मोटारीचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमींवर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.