आंबेनळी घाटामध्ये आज सकाळी पुन्हा एकदा भीषण अपघात झाला. पोलादपूरहून माथेरानला जाणारी एक बीएमडब्यू गाडी चालकाचे नियंत्रण सुटल्याने ५० फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणतीची जीवितहानी झाली नाही.

सकाळच्या सुमारास गाडी घाटामधून जात असतानाच चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी थेट गडीमध्ये कोसळली. मात्र दरीतील घनदाट झाडीमुळे गाडी झाडाला अडकली अन् ती दरीत आणखीन खाली सरकली नाही. या गाडीमध्ये केवळ चालकच होता. झाडांच्या फांद्याच्या मदतीने चालक सुखरुप वर आला. अचानकच गाडीचे नियंत्रण सुटल्याने गाडी दरीत कोसळल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

या बीएमडब्यूच्या चालकाला किरकोळ दुखापत झाली असून त्याला जवळच्या स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आला आहे. नेमका हा अपघात कशामुळे झाला, गाडीवरील नियंत्रण कशामुळे सुटले याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलीस चालकाची चौकशी करणार असून यासंदर्भातील तपास सुरु आहे.

आंबेनाळी घाटामध्ये तीन महिन्यांपूर्वी २८ जुलै २०१८ रोजी दापोली कृषी विद्यापीठाच्या बसला भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये विद्यापिठाच्या २९ कर्मचारी आणि प्राध्यापकांचा दूर्देवी मृत्यू झाला होता. ८०० फूट खोल दरीत कोसळलेली बस दोन महिन्यानंतर ६ ऑक्टोबर रोजी दरीतून बाहेर काढण्यात आली. सात तासांच्या अथक परिश्रमानंतर बस दरीतून वर काढण्यात यंत्रणांना यश आले. या अपघातामध्ये प्रकाश सावंत देसाई हे एकमेव कर्मचारी या अपघातातून आश्चर्यकारकरित्या बचावले होते.