कर्नाटकच्या बीदर जिल्ह्यातील कर्काळ गावातून पंढरीच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यास निघालेल्या वारकऱ्यांच्या इंडिका मोटारीला झालेल्या अपघातात चारजण जागीच ठार, तर इतर चारजण जखमी झाले. पकी दोघांची प्रकृती अत्यवस्थ आहे. गंभीर जखमींवर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उस्मानाबाद तालुक्यातील लातूर-तुळजापूर रस्त्यावर सोमवारी सकाळी सहाच्या दरम्यान हा अपघात घडला.  
औराद तालुक्यातील कर्काळ येथील काही वारकरी पंढरपूरला आषाढी एकादशीनिमित्त पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी इंडिकामधून (एमएच ४३ ए ७८१२) निघाले होते. तुळजापूर-लातूर रस्त्यावरील ताकविकी पाटीजवळ तुळजापूरहून लातूरकडे भरधाव निघालेल्या इनोव्हाशी (एमएच २४ व्ही ७७) इंडिकाची समोरासमोर धडक बसली. इंडिकातील शंकर गोिवद मारडे (वय ५०), बालाजी िपटू सगर (वय ४५), नागनाथ नरसिंग बिराजदार (वय ३५, तिघे कर्काळ, तालुका औराद) हे तिघे, तर इनोव्हाचालक नितीन भीमराव भोसले (वय ३०) जागीच ठार झाले. इंडिकामधील एकनाथ किसन सगर, व्यंकट मलप्पा सगर, सुरेश एकनाथ सगर हे तिघे गंभीर जखमी झाले. जखमींपकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. जखमींवर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही गाडय़ांचा अक्षरश: चक्काचूर झाला. अपघातातील मृतांचे उस्मानाबाद जिल्हा शासकीय  रुग्णालयात शवविच्छेदन केले. बेंबळी पोलीस ठाण्याचे निरीक्षक कोकणे यांनी पंचनामा केला. बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू हाती.