दहावीच्या परीक्षेचे पेपर देऊन घराकडे परत येताना वाटेत ऊस वाहतुकीच्या एका भरधाव ट्रॅक्टरने धडक दिल्याने घडलेल्या अपघातात शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. सोलापूर-पुणे महामार्गावर शहराजवळ कोंडी येथे बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास हा अपघात झाला. मृत विद्यार्थी गरीब घरातील असून विधवा आई त्याचे पालनपोषण करीत असे.
अक्षय हरिश्चंद्र चव्हाण (१६, रा. कोंडी, ता. उत्तर सोलापूर) असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो कोंडी येथेच जिजामाता प्रशालेत शिकत असताना त्याच ठिकाणी दहावी परीक्षा देत होता. दुपारी पेपर सुटल्यानंतर तो घराकडे पायी चालत जात असताना ऊसवाहतूक करणाऱ्या एका भरधाव ट्रॅक्टरने त्यास ठोकरले. यात अंगावरून ट्रॅक्टरचे चाक गेल्याने गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत अक्षय यास शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच तो मरण पावला. अपघातातील ट्रॅक्टर स्थानिक नागरिकांनी पकडला असून सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे. मृत अक्षय याचे वडील तो लहान असताना मरण पावले होते. त्यामुळे अक्षय याच्यासह अन्य एका लहान मुलाचा सांभाळ विधवा आई करीत असे. ती मोलमजुरी  करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित असताना काळाने तिच्यापासून मुलगा हिरावून घेतला.