28 October 2020

News Flash

उत्तर प्रदेशातील गुंडाचा अपघाती मृत्यू

या अपघातामुळे वाटेतच फिरोज अली याचा मृत्यू झाला असल्याचा खुलासा लखनऊ पोलिसांनी केला आहे.

विरार : उत्तर प्रदेश, लखनऊ येथून २०१४ पासून फरार असलेल्या आरोपीला मागील दोन दिवसांपूर्वी लखनऊ पोलिसांनी नालासोपारा येथून अटक केली होती. परंतु मुंबईहून लखनऊला नेताना पोलिसांच्या गाडीला अपघात होऊन त्यात आरोपी जागीच ठार झाला आहे, तर इतर पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

मागील सहा वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील लखनऊ ठाकूरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतून फिरोज अली नावाचा आरोपी फरार झाला होता. या फरार झालेल्या आरोपीचा शोध लखनऊ पोलिसांकडून सुरू होता. परंतु काही केल्या या आरोपीचा शोध लागला नव्हता. पोलिसांपासून लपून बसण्यासाठी महाराष्ट्रातील नालासोपारा शहरात तो राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. विशेष म्हणजे हा आरोपी आपली ओळख कोणालाही पटू नये यासाठी भिकाऱ्याच्या वेशात राहत होता.

फिरोज अलीच्या लखनऊच्या नातेवाईकांवर दबाव टाकत लखनऊ पोलिसांनी त्याची माहिती मिळवली आणि पोलिसांनी पथक तयार करून त्याला २६ सप्टेंबर रोजी नालासोपारा येथून अटक केली होती. त्यानंतर पोलीस त्याला नालासोपाऱ्याहून लखनऊ येथे घेऊन जात होते. मध्य प्रदेशच्या सीमेजवळील ग्वाल्हेर-बैतूल राष्ट्रीय महामार्गावर चंचौडा पोलीस ठाणे हद्दीतील पाखरिया पुरा टोल नाक्याजवळ वाहनाचा अपघात झाला. या अपघातामुळे वाटेतच फिरोज अली याचा मृत्यू झाला असल्याचा खुलासा लखनऊ पोलिसांनी केला आहे.

लखनऊ ठाकूरगंज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. व्ही. राजकुमार यांनी माहिती दिली की, फिरोज अली हा २०१४ पासून फरार आरोपी होता. त्यावर लूट, चोरी, दरोडे आणि इतर अनेक गुन्हे दाखल होते. त्याने आपली टोळी निर्माण केली होती. पण तो आता म्हातारा झाला असल्याने पोलिसांपासून बचावासाठी महाराष्ट्रात पळून गेल्याची माहिती पोलिसांना होती. त्याच्या नातेवाईकांनी तो नालासोपारा येथे असल्याची माहिती दिली. आम्ही पडताळणी केली असता फिरोज अली नालासोपारा परिसरात भिकारी म्हणून एका झोपडपट्टीत राहत होता. त्याचे वय ६८ च्या आसपास होते. आणि त्याच्या डाव्या बाजूला लकवा मारला होता. यामुळे त्याला हालचाल करताना त्रास होत होता. या माहितीच्या आधारे आम्ही त्याला नालासोपारा येथून अटक केली. पण दुर्दैवाने रस्त्यात अपघात झाला आणि त्याचा मृत्यू झाला. त्याच्या जोडीला आमचे पोलीस कर्मचारीसुद्धा जखमी झाले. या संदर्भात आम्ही स्थानिक पोलिसांना कोणतीही माहिती देऊ शकलो नसल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2020 1:52 am

Web Title: accidental death of uttar pradesh goon zws 70
Next Stories
1 पंकजांना रस राज्याच्या राजकारणातच?
2 नवनीत राणांच्या भूमिकेने काँग्रेस-राष्ट्रवादीची पंचाईत
3 महाबळेश्वरला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाल्याने विकासाला चालना
Just Now!
X