करोना लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात महाराष्ट्रासमोर कोणती आव्हानं दिसत आहेत? यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मत व्यक्त केलं आहे. मला महाराष्ट्राच्या समोरचं सर्वात महत्वाचं जे आव्हान दिसतंय ते म्हणजे आर्थिक संकट, हे खूप मोठं संकट आहे. याला आपण कसे सामोरे जाणार आहोत? या पार्श्वभूमीवर केंद्राने देखील राज्यांबाबत काही गोष्टींचा विचार करणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्र हा पहिल्यापासून प्रगतीशील आहे. उत्तम चाललेली गाडी अचानक जर तुम्ही बंद केली. तर सुरू करायला थोडा वेळ जाणार आहे, असं मला वाटतं. पुन्हा सर्व उद्योगधंदे व यामध्ये नोकऱ्या किती गेल्या असतील याची आपण कल्पनाच करू शकत नाही. देशभरात जवळपास 15 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या असल्याचे मला कोणीतरी सांगितलं. कदाचित ही संख्या जास्त किंवा कमी देखील असू शकते. परंतू अशाप्रकारे जेव्हा नोकऱ्या जातील तेव्हा ती लोकं काय करतील? असा सवाल राज ठाकरेंनी यावेळी केला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

आणखी वाचा- लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्र सोडून जाणाऱ्या परप्रांतीयांना राज यांनी खडसावले, म्हणाले…

या वेळी बोलताना राज म्हणाले आज महाराष्ट्रातील अनेक परप्रांतीय त्यांच्या राज्यात जाण्यासाठी निघालेले आहेत. त्यांना जाण्यास मूभा देखील देण्यात आली आहे. मात्र असं जरी असलं तरी एक राज्य यामुळे अडता कामा नये, जर समजा ते गेले व पुन्हा आलेच नाहीत तर उद्या आपण हातावर हात ठेवून बसायचं का? सरकारने या सर्व बाबींचा आत्ताच विचार करणं आवश्यक आहे. आज ते जर दुसऱ्या राज्यात गेले व पुन्हा जेव्हा मोठ्या संख्येने येतील तेव्हा पुन्हा करोना सारखे आजार घेऊन येतील, तेव्हा त्याची तपासणी कोण करणार? असा सवालही त्यांना यावेळी केला.