उस्मानाबाद जिल्हा बँकेत मुदतठेवीमध्ये गुंतवलेल्या रक्कमेसाठी मागील दोन ते तीन वर्षापासून चकरा मारणाऱ्या एसटी महामंडळाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा पूर्ण पैसे मिळत नसल्याच्या मानसिक तणावातून हृदयविकाराच्या धक्क्याने बुधवारी दुपारी मृत्यू झाला. या मृत्यूला बँकेचे प्रशासन व पदाधिकारीच जबाबदार आहेत असा आरोप करत संतप्त नातेवाइकांनी गुरूवारी मृतदेह थेट बँकेच्या प्रवेशद्वारावर ठेवून याप्रकरणी जाब विचारला. तब्बल पाऊन तासापेक्षा जास्त काळ चाललेल्या या खळबळजनक प्रकारामुळे बँक प्रशासन व पदाधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.‌

उस्मानाबाद शहरातील गणेश नगर येथील रहिवाशी गुलाब विरभद्र पारशेट्टी हे एसटी महामंडळातून चालक पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत. सेवानिवृत्तीनंतर पारशेट्टी यांनी आयुष्यभराच्या मेहनतीतून मिळालेली आपली पुंजी जिल्हा बँकेच्या तीन शाखांमध्ये मुदतठेवीत गुंतवली होती. दरम्यान, बँकेची आर्थिक परिस्थिती डगमगली आणि लाखो ठेवीदारांबरोबर पारशेट्टी यांचीही मुदतठेवीची रक्कम जिल्हा बँकेत अडकली. एसटी महामंडळात सेवानिवृत्तीनंतर पेन्शनची सोय नसल्याने याच रक्कमेची त्यांना आशा होती.

परंतु, बँकेकडे अनेक फेऱ्या मारल्यानंतर पारशेट्टींना त्यांच्या लाखोंतील रक्कमेपैकी काही हजार हातात टेकवून पुढील आश्वासन देऊन परत पाठविले जात होते. यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून पारशेट्टी अस्वस्थ होते. त्यांना पैशाची गरज असताना बँकेकडून महिन्याकाठी दहा ते पंधरा हजार हातात टेकवून निराश केले जात असल्याने ते चिंतेत होते. यातूनच त्यांच्या मनावरील ताण वाढून बुधवारी दुपारनंतर हार्टअटॅकने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातलगांनी केला. या घटनेला जिल्हा बँकच जबाबदार आहे असा आरोप करत गुलाब पारशेट्टी यांच्या नातलगांनी गुरूवारी सकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेहासह रुग्णवाहिका थेट जिल्हा बँकेत आणून त्यांचा मृतदेह मुख्य शाखेच्या प्रवेशद्वारावर ठेवत बँकेला जाब विचारला. यामुळे उपस्थित बँक अधिकारीही हादरून गेले. त्यातच नुकतीच बँक सुरू होत असल्याने कोणीही वरिष्ठ अधिकारी हजर नव्हता. त्यामुळे उपस्थित अधिकाऱ्यांना काय करावे हा प्रश्न पडला. त्यानंतर वरिष्ठांनी येऊन नातलगांची भेट घेऊन आतापर्यंत दिलेली रक्कम याची माहिती देऊन उर्वरीत रक्कमही तीन महिन्यात तीन हप्त्यामध्ये देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर पाऊन तासाने मृतदेह नातलगांनी तेथून अंत्यविधीसाठी नेला.

भावाच्या मृत्यूला बँकच जबाबदार
शवविच्छेदनानंतर गुलाब पारशेट्टी यांचा मृतदेह घेऊन त्यांचा भाऊ, मेहुने, मुलगा व इतर नातलग तसेच परिसरातील नागरिक १०.३० वाजता थेट बँकेत दाखल झाले. त्यांनी बँकेच्या प्रवेशद्वारावरच मृतदेह ठेवून पैसे ठेवले तसा मृतदेहही ठेवून घ्या असे म्हणत प्रवेशद्वारावरच थांबले. जोपर्यंत बँकेतील पैसे मिळत नाहीत तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका घेतली. हा प्रकार पाऊन तास सुरू होता. त्यानंतर बँकेचे हिशोब विभागाचे मुख्याधिकारी एस.एम. पाटील यांच्यासह अधिकाऱ्यांनी नातलगांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच त्यांच्या बचत खात्यावरील रक्कम तीन महिन्यात दरमहा समान हप्त्यामध्ये देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर नातलगांनी मृतदेह अंत्यविधीसाठी घेऊन गेले.

२०१६ पासून पैशासाठी हेलपाटे
गुलाब पारशेट्टी हे एप्रिल २०१६ पासून खात्यावरील रक्कम मिळावी याकरीता बँकेच्या मार्केट यार्ड शाखा तसेच मुख्य कार्यालयात चकरा मारत होते. जिल्हा बँकेत शाखा ते एमडी, मुख्याधिकारी यांचे दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यावरील दालन अशा अनेक फेऱ्या मारल्यानंतर त्यांना लाखो रुपयांपैकी पंधरा ते वीस हजार देऊन बोळवण केली जात. त्यांच्या खात्यावर जवळपास १५ लाख रुपये होते. मागील अडीच वर्षात अनेक फेऱ्यानंतर त्यांना ९.३७ लाख रुपये टप्प्याटप्प्याने देण्यात आले. बुधवारीही ते बँकेत पैसे मिळावेत याकरीता गेले होते. परंतु, तुम्हाला १ फेब्रुवारीलाच २५ हजार दिले आहेत असे म्हणून रक्कम देण्यास नाकारण्यात आले. बँकेतून हताशपणे परतल्यानंतर घरी असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला.

बँकेसमोर आर्थिक अडचण असतानाही पारशेट्टी यांना त्यांच्या रक्कमेपैकी ९ लाख ३७ हजार रुपये देण्यात आले आहेत. त्यांच्या खात्यावरील ५.५८ लाख रुपये पुढील तीन महिन्यात तीन टप्प्यात परत करण्यात येतील. तसेच मुदतठेवीची रक्कमही पावत्याची तारीख पूर्ण होताच खात्यावर जमा करून देण्यात येइल. एस.एम.पाटील, मुख्याधिकारी-हिशोब विभाग.