करोना उपचार केंद्रांमधील वस्तूंचा हिशेब; खरेदी करण्याच्या सूचनांचे उल्लंघन असल्यास कारवाई

पालघर : पालघर जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात विविध ठिकाणी करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी केंद्रे उभारण्यात आली आहेत. या केंद्रामध्ये रुग्णांच्या सोयीकरिता वापरण्यात येणाऱ्या अधिकांश वस्तू या खरेदी न करता त्या भाडेतत्त्वावरच घेणे सुरू आहे, याबाबतचे पुनरावलोकन करण्यात येणार आहे. या उलटतपासणीमध्ये खरेदी करण्याच्या सूचनांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिला आहे.

करोना रुग्णांच्या उपचारांसाठी विविध ठिकाणी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. त्या ठिकाणी रुग्णांसाठी खाट, पंखे तसेच विद्युत पुरवठा खंडित झाल्यास जनरेटर सेट प्रथमत: भाडेतत्त्वावर घेण्यात आले होते. मात्र या नेहमीच्या वापरातील गोष्टी असल्याने  त्यांची खरेदी करण्याचे संबंधित अधिकारी वर्गाला सूचित करण्यात आले होते.  मात्र असे असले तरी पालघर व जव्हार येथील काही उपचार केंद्रांवर यातील काही वस्तू  या भाडेतत्त्वावरच घेतल्या जात आहेत.  हे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर  ही बाब गंभीर असल्याचे त्यांनी मान्य केले. ज्या वस्तूंचे भाडे हे त्यांच्या मूळ किमतीपेक्षा अधिक असू नये असे संबंधितांना वेळोवेळी सूचित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे जिल्ह्य़ात विविध ठिकाणी भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या वेगवेगळ्या वस्तूंचे पुनरावलोकन करण्याच्या सूचना त्यांनी सहकारी अधिकारी यांना दिल्या.

समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक

ल्ल करोना संक्रमणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध ठिकाणी करोना काळजी केंद्र (कोविड केंर सेंटर), करोना समर्पित आरोग्य केंद्र (डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर) तसेच समर्पित करोना रुग्णालय (डेडीकेट कोविड हॉस्पिटल) स्थापन करण्यात आले आहेत.

ल्ल आरोग्य केंद्रांमध्ये भोजनाचा दर्जा, स्वच्छता, नातेवाईकांसाठी मदत कक्षाची व्यवस्था करणे, सीसीटीव्ही कॅमेरा सुस्थितीत असल्याबाबत तपासणी करणे, वीज व पाण्याची व्यवस्था करणे, करोना रुग्ण व वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत तयार होणार घातक घन कचरा योग्य पद्धतीने विल्हेवाट करणे, रुग्णांचे अभिलेख व्यवस्थित ठेवणे तसेच रुग्णांची संबंधित इतर बाबींवर नियंत्रण ठेवणे व इतर अनुषंगिक बाबींकरिता हॉस्पिटल निहाय समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक जिल्हाधिकारी यांनी केली आहे.

ल्ल या समन्वय अधिकाऱ्यांमार्फत स्वच्छता मदत केंद्र व इतर बाबीं करिता सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधण्याची जबाबदारी नेमून दिली असून या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, पाटबंधारे बांधकाम विभाग, जिल्हा परिषद पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद जलसंधारण विभाग इत्यादी विभागांतील अभियंता व अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.