महाराष्ट्र सदनातील एका निरीक्षकास जबरदस्तीने चपाती खायला घालून त्याचा रोजा मोडायला लावल्याचा आरोप शिवसेनेचा आवाज दाबण्यासाठी झाल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी येथे बोलताना सांगितले. विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय परिस्थतीचा अंदाज घेण्यासाठी ठाकरे येथे आले होते. विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी या बाबत झालेले आरोप शिवसेनेचा आवाज दाबण्यासाठी केले असल्याचे सांगितले.
शिवसेना एवढय़ा खालच्या पातळीवर जात नाही, असे सांगत त्यांनी दिल्लीतील घटनेवर भाष्य केले. आम्ही िहदुत्ववादी असल्याचे ठणकावून सांगत असलो, तरी अन्य धर्मातील व्यक्तींच्या भावनांची कदर करतो, असेही ते म्हणाले. प्लँचेटच्या आधारे पुणे पोलीस नरेंद्र दाभोलकर हत्येचा तपास करीत असल्याचे पुरावे आता मिळत आहेत, तेव्हा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी कारवाई करावी, असेही ते म्हणाले. पोलीस जेथे नीट तपास करतात, त्यांच्याही पाठीशी गृहमंत्री उभे ठाकत नाहीत. त्यामुळे या विषयावर पुढे बोलत राहावे लागेल, असेही ठाकरे एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.
नारायण राणे यांनी केलेल्या टीकेवर बोलण्याचे त्यांनी टाळले. त्यांना ‘शुभेच्छा’ एवढेच ते म्हणाले. विधानसभेच्या तयारीसाठी पदाधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. कोणत्या विधानसभा क्षेत्रात कोणाला उमेदवारी याची चाचपणी बुधवारी करण्यात आली. पठणच्या जागेवर जि. प. सदस्या सुरेखा जाधव यांनी उमेदवारीसाठी दावा केला आहे. जागा वाढवून घेण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती काही इच्छुक उमेदवारांनी केल्याची माहिती आहे.