येथील मुख्य रस्ता व जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेत शस्त्र दाखवून सगळ्यांना दहशतीखाली ठेवत धमकावणाऱ्या आरोपीस पोलीस उपअधीक्षक संजय सातव व पोलीस कर्मचारी बळीराम काकडे  यांनी शिताफीने पकडले. या दोघांवर त्याने चाकू हल्ला करून जखमी केले. पोलिसांनी दाखवलेल्या धाडसाचे कौतुक होत आहे.

कर्जत शहरातील मेन रोडवर असणारी जिल्हा सहकारी बँकेची शाखा या परिसरामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचा विलास अबलुक्या काळे हा मागील अनेक महिन्यांपासून बँक कर्मचारी व बँकेत येणाऱ्या नागरिकांत दहशत पसरवत होता. एके दिवशी बँक अधिकारी श्री भोसले हे बँक उघडून आतमध्ये येताच तो त्यांच्या पाठीमागे बँकेमध्ये शिरला त्यामुळे भोसले हे उडी मारून  बँकेच्या बाहेर पळून गेले.

आज सकाळपासून विलास अबलुक्या काळे  यांनी मेन रोड व बँक परिसरात दहशत निर्माण केली होती. हातामध्ये शस्त्र घेऊन तो बँकेमध्ये शिरला. तिजोरीची चावी मागत होता.  त्याने एक तास बँकेचे कर्मचारी व नागरिकांना वेठीस धरले होते. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांना फोन करून या घटनेची माहिती दिली. यावेळी सातव हे जामखेडकडून कर्जतकडे येत होते. त्यांनी पोलीस कॉन्स्टेबल बळीराम काकडे यास काही कर्मचाऱ्यांसोबत बँक परिसरामध्ये जाऊन त्या गुन्हेगारास ताब्यात घेण्याच्या  सूचना दिल्या. उपनिरीक्षक  शिरसाट, पोलीस कॉन्स्टेबल  बळीराम काकडे, जाधव त्या ठिकाणी पोहोचले तर हातामध्ये शस्त्र घेऊन हा गुन्हेगार त्या परिसरामध्ये दहशत निर्माण करत होता. त्यांनी शरण येण्यास सांगितले. दरम्यान सातव यांनी त्याला पाचशे रुपये देतो असेही सांगितले. त्याने सातव यांच्याकडून पाचशे रुपयाची नोट घेतली. पण शस्त्र देण्यास नकार दिला  दरम्यान  रोहिदास आढाव यांनी त्याला पाठीमागून घट्ट मिठी मारली. त्यानंतर  संजय सातव व बळीराम काकडे यांनी त्याच्या अंगावर झडप घातली  आरोपीच्या हल्ल्यात संजय सातव यांच्या डाव्या हाताला तर पोलीस कॉन्स्टेबल बळीराम काकडे यांच्या उजव्या हाताला जखम झाली.  त्यांनी त्याचे शस्त्र काढून घेतले व यानंतर त्याला पोलीस ठाण्यात  घेऊन गेले. पोलीस कॉन्स्टेबल बळीराम काकडे यांच्या फिर्यादीवरून विलास अबलुक्या काळे त्याच्यावर भादंवि कलम ३५३ व ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.