मुसळधार पावसामुळे नगरमधील पूरपरिस्थितीचा फायदा उचलत पाथर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपी बेड्यांसह फरार झाला आहे. भय्या उर्फ मोईन गुलाब शेख असं या आरोपीचं नाव आहे. तो पाथर्डी तालुक्यातील असून त्याच्यावर बलात्कार आणि अपहरणाता गुन्हा दाखल आहे.
शेखला सुनावणीसाठी पाथर्डीहून नगर जिल्हा सत्र न्यायालयात नेण्यात आलं होतं. यावेळी त्याच्या सोबत दिनेश पालवे नावाचा आणखी एक आरोपी देखील होता. सुनावणीनंतर परतताना मेहकरीला पुलावरुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होतं. त्यामुळे याठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. आरोपीला ज्या एसटीतून पार्थडीला आणण्यात येत होते ती एसटी तब्बल अडीच तास या वाहतूक कोंडीत अडकली होती. यावेळी लघुशंकेच्या बहाण्याने आरोपी एसटीतून खाली उतरला. त्यानंतर पोलिसांना धक्का देत बेडीसह तो पसार झाला. शेख याच्यावर बलात्कार आणि अपहरणचा गुन्हा आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 21, 2017 2:33 pm