पालघर : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील ए. एन. के. फार्मा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत ११ जानेवारी रोजी झालेल्या दुर्घटनेप्रकरणी बोईसर पोलिसांनी कंपनीच्या मालकाविरुद्ध हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.

११ जानेवारी रोजी सायंकाळी ६.५० वाजता या कंपनीत झालेल्या भीषण स्फोटामध्ये आठ कामगारांचा मृत्यू झाला होता, तर इतर सात व्यक्तींना गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या होत्या. ज्या प्रसंगी हा अपघात घडला त्याप्रसंगी रिअ‍ॅक्टरमध्ये अकुशल कामगारांकडून उत्पादन घेतले जात होते. तसेच रिअ‍ॅक्टरमधील रासायनिक प्रक्रिया, स्फोटक पदार्थाबाबत तसेच यंत्रसामग्रीबाबत निष्काळजीपणाचे वर्तन केल्याच ठपका ठेवून कंपनीच्या मालकाविरुद्ध बोईसर पोलीस ठाणे येथे हलगर्जीसंदर्भात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा अपघात घडला त्या वेळेला तांत्रिक माहिती असलेला एक कामगार मृत पावला तर कंपनीचे मालक गंभीररीत्या आजारी असल्याने त्यांच्याकडून माहिती उपलब्ध नव्हती. या संदर्भात औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांत १३ जानेवारी रोजी मध्यरात्री प्राथमिक अहवाल सादर केला होता. तरीदेखील पोलीस पुरावे गोळा करण्याच्या कारणास्तव गुन्हा दाखल करण्याचे टाळत होते. या कंपनीमध्ये परवानगी नसलेले उत्पादन घेतले जात असल्याने आठ निष्पाप जीवांना प्राणाला मुकावे लागल्याचे प्रथमदर्शनी पुढे आले आहे. असे असताना सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याऐवजी पोलिसांनी निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केल्याने कारखाना व्यवस्थापनाच्या बाजूने पोलिसांनी झुकते माप दिले आहे, असे मत आरोप तारापूर येथील कामगार संघटनेच्या प्रतिनिधींकडून व्यक्त केला जात आहे.

प्रदूषणकारी चार कारखान्यांना नोटीस

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणकारी कारखान्यांबाबत चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्याने चार उद्योगांना उत्पादन बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कारखान्यांचे वीज व पाणी बंद करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानी संबंधित विभागांना सूचित केले आहे. राष्ट्रीय हरित लवादा निर्णयानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यातील काही विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना तारापूरमध्ये प्रदूषणकारी कारखान्यांची तपासणी करण्यासाठी पाठवले होते. समितीने केलेल्या तपासणीमध्ये दोषी आढळलेल्या कारखान्यांना बंद करण्यात येत असून यामध्ये एन. जी. एल. फाइन केम, डी. एच आँर्गानिक, रेजाँनिक स्पेशलिटी लि., कॅम्लीन फाइन सायन्स या कारखान्यांचा समावेश आहे.