पोलिसांच्या हातावर तूरी देऊन स्थानकातून आरोपी फरार झाल्याची घटना जळगावमध्ये घडली. मोबाइल चोरट्याला पकडल्यानंतर त्याच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर टाकण्यात गुंग असलेल्या पोलिसांची नजर चुकवून आरोपीने चक्क पोलीस ठाण्यामधून पळ काढला. बुधवारी रात्री जळगाव शनिपेठ पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला.

जामनेर शहरातील इंद्र ललवाणीनगरातील शुभम संजू पाटील (वय २०) हा कामानिमित्त जळगावला आला होता. तो जामनेरला परत जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत एका चोरट्याने त्याचा २० हजार रुपयांचा मोबाइल लंपास केला. याप्रकरणी तक्रार दाखल दाखल केल्यानंतर पोलीसांनी मोहन प्रकाश भारुळेला अटक केली. पण तो पोलीस स्थानकातून फरार झाला.

शनिपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी जितेंद्र सोनवणे आणि अमित बाविस्कर यांना बसस्थानकावरील मोबाइल चोरटा कोळी पेठेतील असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे उपनिरीक्षक सुरेश सपकाळे, सोनवणे, बाविस्कर, गणेश गव्हाळे यांच्या पथकाने संशयित मोहन प्रकाश भारूळे (वय २०, रा.कोळीपेठ) याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. त्याच्याकडे ललवाणीचा मोबाइलही सापडल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. भारूळेला पकडून आणल्यानंतर त्यासोबत फोटोसेशन झाले. हे फोटो प्रसारमाध्यम व सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी देण्यात पोलीस गुंग असताना पोलिसांना गुंगारा देत मुख्य प्रवेशद्वारातूनच पसार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.