अल्पवयीन मुलीवर सतत अत्याचार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी उस्मानाबाद येथील शंकर जाधव या आरोपीस तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जे. राय यांनी मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील जुनोनी येथील आरोपी शंकर सूर्यभान जाधव याने मजुराच्या १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केले. यानंतर याबाबत आई-वडिलांस सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली होती. अनेक दिवस मुलीवर दबाव आणून वारंवार अत्याचार केल्यामुळे अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली होती. दरम्यान, मासिक पाळी येत नसल्याने आई-वडिलांनी तिला रुग्णालयात नेवून तपासणी केली असता, हा प्रकार समोर आला. यानंतर मुलीने आई-वडिलांसमवेत उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाणे गाठून घडलेली सर्व हकीकत सांगितली. याप्रकरणी आरोपी शंकर जाधव याच्याविरूध्द अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रकरणाचा संपूर्ण तपास केल्यानंतर पोलीस निरीक्षक गावडे यांनी सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी तथर्द जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जे. राय यांच्या न्यायालयात चालली. प्रकरणात १३ साक्षीदार तपासण्यात आले. अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सचिन सूर्यवंशी यांनी केलेला युक्तीवाद आणि पुरावे ग्राह्य धरून सत्र न्यायाधीश आर. जे. राय यांनी आरोपी शंकर जाधव यास जन्मठेप व ११ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.