भंडारा जिल्हा रुग्णालयातील अग्निकांडप्रकरणी तब्बल ४० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर दोन अधिपरिचारिकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंत्राटी परिचारिका शुभांगी साठवणे आणि स्मिता आंबिलढुके असे गुन्हा दाखल झालेल्यांचे नाव आहे. साकोलीचे उपविभागीय अधिकारी अरुण वायकर यांनी गुरुवारी रात्री १० वाजता ही तक्रार दिली. त्यावरून भंडारा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती, पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी दिली.
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ९ जानेवारीच्या पहाटे लागलेल्या आगीत दहा बालकांचा जळून मृत्यू झाला होता. कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी दोन कंत्राटी अधिपरिचारिकांना तपास यंत्राणांनी दोषी ठरवले होते. या प्रकरणात आतापर्यंत अकस्मात मृत्यूची नोंद होती. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीही करण्यात आली. त्यावरून जिल्हा शल्यचिकित्सकासह सात जणांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र गुन्हा दाखल झाला नव्हता. या प्रकरणात दोन्ही परिचारिकांनी अटकपूर्व जामिनासाठी भंडारा जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यावर २२ फेब्रुवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांना न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. विभागीय आयुक्त संजीव कुमार यांच्या नेतृत्वात गठित तज्ज्ञ समितीचा तथ्य- शोध अहवालही भंडारा पोलिसांना देण्यात आलेला नाही. तज्ज्ञ समितीच्या अहवालासंदर्भात भंडारा पेालिसांना अंधारात का ठेवण्यात आले, याचे कारण स्पष्ट नाही. तांत्रिक तज्ज्ञ आणि फॉरेन्सिक सायन्सचे प्राथमिक अहवाल पोहचले आहेत. परंतु निष्कर्षांवर अधिक चौकशी केली जात आहे. अहवालात दिलेल्या काही गोंष्टींची शहानिशा करण्याकरिता भंडारा पोलिसांना काही प्रश्न उपस्थित केले होते ते अद्यापही संबंधित समितीकडून अनुत्तरित आहेत. दरम्यान भंडारा जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत जाधव गुरुवारीच सुटीवरून परत आले असून जिल्ह्य़ात दाखल होताच दोषींवर गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 20, 2021 12:09 am