कोल्हापुरमधील पन्हाळा तालुक्यातील पनोरे येथे एका भावाचा खून करत, दुसऱ्या भावास जखमी करणाऱ्या आरोपीला गुरुवारी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. बळवंत ऊर्फ बाळू ज्ञानू घाग असे या आरोपीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, पनोरे गावातील पांडुरंग ज्ञानू घाग व संभाजी ज्ञानू घाग हे सख्खे भाऊ आहेत. बळवंत घाग गावातील शरद चौगुले यांच्या बहिणीची छेड काढल्याने भांडण झाले होते. तेव्हा गाव सभा झाल्यानंतर पांडुरंग घाग व जखमी साक्षीदार संभाजी घाग यांनी गावकऱ्यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला होता.

या रागातून संशयित आरोपी भगवान शेलार यांची बंदूक घेऊन भगवान शेलार याच्यासह बळवंत घाग हे पांडुरंग घाग यांच्या घरी रात्री गेले होते. त्यांनी दरवाजा उघडण्यास भाग पाडले. त्यावर बळवंत घाग यांनी बंदुकीची गोळी पोटात मारल्याने पांडुरंग घाग यांचा मृत्यू झाला. भांडण सोडवण्यासाठी पुढे आलेले संभाजी घाग यांच्या डोक्यावर बंदुकीने मारहाण करून जखमी केले.

यावरून कळे पोलिसांमध्ये बळवंत घाग, गुंडू सखाराम पाटील व भगवान शेलार या तिघांनी विरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्याची सुनावणी होऊन बळवंत घाग त्यास दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा देण्याचा आदेश जिल्हा न्यायाधीश डी. के. गुडधे यांनी दिला. सरकारी अभियोक्ता म्हणून सुजाता इंगळे यांनी काम पाहिले तर कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. एस. जगताप यांनी याचा तपास केला होता. गुंडू सखाराम पाटील या आरोपीचा मृत्यू झाला आहे. तिसरा आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. न्यायालयातून व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे सुनावणी घेण्यात आली होती.