शहराच्या गंजबाजार भागातील तरुण व्यापारी जितेंद्र भाटिया यांच्या खूनप्रकरणातील आरोपी, त्याची पत्नी हेमा ऊर्फ दिव्या भाटिया हिच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने शुक्रवारी चार दिवसांची (दि. १२) वाढ केली. या गुन्ह्य़ातील आणखी एक आरोपी विक्रम ऊर्फ गोटय़ा बेरड याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिका-यांनी हा आदेश दिला. हेमा व प्रदीप जनार्दन कोकाटे यांच्या अनैतिक संबंधात जितेंद्र अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून त्याचा खून केल्याचा गुन्हा कोतवाली पोलिसांनी दाखल केला आहे. प्रदीपच्या कोठडीत दोन दिवसांपूर्वीच, दि. १२ पर्यंत वाढ करण्यात आली होती. हेमा व बेरड या दोघांच्या पोलीस कोठडीची मुदत आजपर्यंत होती. दोघांना पुन्हा न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते. बेरड याने खुनासाठी कोकाटेला गावठी पिस्तूल उपलब्ध करून दिले होते. बेरडकडून पोलिसांनी याशिवाय आणखी एका गावठी पिस्तूल हस्तगत केले आहे.
दरम्यान, पोलिसांनी हेमा हिच्याकडून गुन्ह्य़ात वापरलेला आणखी एक मोबाइल जप्त केला. मात्र त्याचे सिमकार्ड आपण तोडून फेकून दिल्याचे ती पोलिसांना सांगत आहे. गुन्ह्य़ात आणखी कोणी सहभागी आहेत का, याचाही तपास पोलीस करत आहेत. न्यायालयात सरकारतर्फे सरकारी वकील शेख, आरोपींच्या वतीने वकील संजय दुशिंग व वकील महेश तवले काम पाहात आहेत.