उपविभागीय अधिकाऱ्यांकडून पाहणी; आजपासून पाडकामास सुरुवात

नीरव मोदी याच्या किहीम येथील बंगल्यापाठोपाठ आता उद्योगपती अशोक मित्तल यांच्या मांडवा, कोळगाव येथील बंगल्यावर कारवाई करण्यात येणार आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार मित्तल यांच्या बंगल्याचे शुक्रवारपासून पाडकाम करण्यात येणार आहे. उपविभागीय अधिकारी शारदा पोवार यांनी गुरुवारी बंगल्याची पाहणी केली. त्यांनी महसूल, पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या.

मांडवा जेटीजवळील कोळगाव पाच एकर परिसरात हा आलिशान बंगला आहे. ५१५ चौरस मीटर बांधकामाची परवानगी असताना, या बंगल्याचे १ हजार ४१० चौरस मीटर बांधकाम करण्यात आले आहे. या वाढीव अनधिकृत बांधकामाविरोधात बॉम्बे एन्वायरन्मेंट अ‍ॅक्शन ग्रुपने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याचा निकाल १ नोव्हेंबर २०१८ रोजी लागला. उच्च न्यायालयाने महिन्याभराच्या आत अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते.

उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात मित्तल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत मित्तल यांची याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे आता नीरव मोदी यांचा किहिम येथील बंगला पाडल्यानंतर प्रशासनाला मित्तल यांच्या कोळगाव येथील बंगल्यावर कारवाई करावी लागणार आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मित्तल यांना प्रांताधिकारी कार्यालयाने नोटीस बजावली होती. तीन महिन्यांच्या आत अनधिकृत बांधकाम पाडून टाकावे, अन्यथा जिल्हा प्रशासनाच्या वतीने कारवाई केली जाईल, अशी नोटीस प्रांताधिकारी शारदा पोवार यांनी बजावली होती. यानंतर बंगल्याचा काही भाग मित्तल यांच्याकडून पाडण्यात आला होता. मात्र न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे आवश्यक बांधकाम न हटविल्याने  प्रशासनाकडून बंगल्याचे पाडकाम केले जाणार  आहे.

जिल्हा प्रशासनाकडून यापूर्वी अलिबाग तालुक्यातील किहीम समुद्र किनाऱ्यावरील नीरव मोदी याचा बंगला पाडण्यात आला होता. अविनाश कोठारी यांच्या बंगल्यावरही कारवाई करण्यात आली होती.