– मंदार लोहोकरे

राज्य सरकारने करोनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिकस्थळांसह राज्यभरातील प्रमुख मंदिरं दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे .मात्र असे असुनही १६ भाविक विनापरवानगी पंढरपुरात दर्शनासाठी आले होते, या सर्वांवर स्थानिक प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे.

मंगळवारी निर्जला एकादशी होती. या निमित्त हे भाविक पंढरीत आले होते.या सर्व भाविकांवर प्रशासनाने कारवाई केली आहे. दरम्यान,३० जून पर्यंत पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेले आहे.

करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे बंद  ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे ३० जून पर्यंत दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. असे असतानाही मंगळवारी निर्जला एकादशी निमित्त दर्शनासाठी काही भाविक पंढरीत दाखल झाल्याचे दिसून आले. या भाविकांनी चंद्रभागा नदीत स्नान,नगरप्रदक्षिणा आणि मंदिर बंद असल्याने कळसाचे दर्शन घेतले.  त्यानंतर नामदेव पायरी येथे काही भाविक जमा झाले होते. हे पाहून स्थानिक नागरिकांनी या भाविकांची चौकशी केली असता, दर्शनासाठी आल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिकांनी ही माहिती तात्काळ प्रशासनाला कळवली. यानंतर तातडीने पालिका आणि पोलीस प्रशासन नामदेव पायरी येथे आले. त्या सर्वांची चौकशी केली असता, त्यांच्यापैकी कोणाकडेही परवानगी नसल्याचे दिसून आले.

आणखी वाचा- Coronavirus: पंढरपुरातील मठ आणि धर्मशाळांमध्ये वास्तव्यास बाहेरील लोकांना बंदी

नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर आदी भागांमधून १६ भाविक आले होते. यातील काही भाविक दुचाकी तर काही चारचाकी घेवून पंढरीत दाखल झाले होते. या सर्व भाविकांवर प्रशासनाने तात्काळ कारवाई केली. दरम्यान ,या प्रकारानंतर शहरात येणाऱ्या सर्व रस्त्यावर बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. जर कोणी बाहेरगावाहून व्यक्ती आलेला दिसला तर प्रशासनाला माहिती द्या, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.