महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने गुरुवारी बाजारपेठेत पुन्हा हातोडा फिरवला. माणिक चौकापासून दाणे डबऱ्यापर्यंतच्या बाजारपेठांबरोबरच मंगलगेट, कोठला भागातील मोठी अतिक्रमणे पाडण्यात आली. मंगलगेट भागात या कारवाईला काहींनी विरोधही दर्शवला, मात्र या पथकाने नेटाने कारवाई केली.
गेल्या पंचवीस दिवसांपासून मनपाने शहरात अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू केली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागासह सावेडी, केडगाव, स्टेशन रस्ता, पुणे रस्ता या उपनगरांतही या काळात अतिक्रमणे पाडण्यात आली. काही ठिकाणची पक्की अतिक्रमणे, संरक्षक भिंतीही या पथकाने भुईसपाट केल्या. मात्र ज्या ठिकाणी ही मोहीम राबवण्यात आली तेथे पुन्हा अतिक्रमणे होत असल्याचे लक्षात आल्याने दहा दिवसांनंतर पुन्हा शहरात विरोधी कारवाई सुरू करण्यात आल्याचे मनपाच्या अतिक्रमणविरोधी पथकाचे प्रमुख सुरेश इथापे यांनी सांगितले.
या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यातच माणिक चौक, कापड बाजार, मोची गल्ली, तेली खुंट, आडत बाजार, दाळ मंडई आदी भागांतील अतिक्रमणे साफ करण्यात आली होती. त्यातील काही ठिकाणी ती पुन्हा झाल्याने गुरुवारी या भागात पुन्हा अतिक्रमणविरोधी मोहीम राबवण्यात आली. या बाजारपेठांसह कोठला बसस्थानक, मंगलगेट, राज चेंबर या गर्दीच्या ठिकाणची अतिक्रमणेही गुरुवारी भुईसपाट करण्यात आली. या भागात बऱ्याच हॉटेल व्यावसायिकांनी थेट रस्त्यावरच त्याचा विस्तार केला होता. ही सर्व अतिक्रमणे काढण्यात आली. मंगलगेट भागात काहींनी त्यात अडथळा आणण्याचाही प्रयत्न केला, मात्र कारवाई सुरूच राहिली. त्यात आता खंड पडणार नाही, असे इथापे यांनी सांगितले.