शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचाराबाबत नेहमी सर्वत्र बोलले जात असताना रत्नागिरी जिल्ह्य़ात मात्र वर्षभरात अवघ्या १२ लाचखोर अधिकाऱ्यांना सापळा रचून पकडण्यात यश आले आहे.
या बारा जणांपैकी राजापूरच्या तहसीलदाराला २ लाख रुपये, तर सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या साहाय्यक पोलीस निरीक्षकाला पन्नास हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. बाकी १० प्रकरणांमधील लाचेची रक्कम त्यापेक्षा कमी आहे. जाणकारांच्या मते यापैकी कार्यालयात बसून स्वत:च्या हाताने फिर्यादीकडून रक्कम स्वीकारणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवरील आरोप सिद्ध होण्याची काही प्रमाणात शक्यता असते.
मात्र कार्यालयाबाहेर हॉटेल किंवा अन्य ठिकाणी स्वीकारलेल्या रकमेबद्दल उसनी दिलेली रक्कम परत घेतल्याचा बचाव केला जाण्याची दाट शक्यता असते. अशा परिस्थितीत केवळ परिस्थितीजन्य पुराव्याआधारे गुन्हा शाबीत होणे अतिशय अवघड असते. स्वाभाविकपणे आरोपीला संशयाचा फायदा मिळून मुक्तता होते.
सरकारी कार्यालयांमधील भ्रष्टाचार सर्वज्ञात आणि सर्वमान्य असूनही वर्षभरात केवळ सरासरी महिन्याला एक , इतक्या कमी प्रमाणात लाच घेणारे अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या जाळ्यात कसे सापडले, याबाबत खुलासा करताना एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, सरकारी कार्यालयांमधील लाचखोरीच्या विरोधात तक्रार नोंदवण्यासाठी मोठय़ा प्रमाणात जनजागृती मोहीम राबवूनही सामान्य नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. लाच देऊन काम करून घेण्याकडे अजूनही बहुसंख्याकांचा कल असतो. शासकीय कार्यालयांमधील लाल फितीचा कारभारही त्याला कारणीभूत आहे. शिवाय एखाद्या सरकारी कर्मचारी-अधिकाऱ्याविरुद्ध सापळा रचल्याची पूर्वसूचना मिळवण्यात संबंधित अधिकारी यशस्वी होण्याचेही प्रकार घडतात. त्यामुळे लाचलुचपत विभागाच्या कारवाया असफल ठरतात.
दरम्यान, गेल्या वर्षभरात राज्यभरातील कारवाईबाबत या विभागातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार एकूण १ हजार २२६ सापळे रचण्यात आले. त्यामध्ये एकूण १ हजार ५८४ शासकीय कर्मचारी-अधिकारी किंवा एजंट लाच स्वीकारताना सापडले. त्यांच्याकडून एकूण २ कोटी ४६ लाख १२ हजार १७१ रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली.
यापैकी शासकीय प्रथम श्रेणीचे ७६ अधिकारी, द्वितीय श्रेणीचे १२९ अधिकारी, तृतीय श्रेणीचे १ हजार २६ कर्मचारी आणि चतुर्थ श्रेणीच्या ६० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच ७३ लोकप्रतिनिधी आणि २२० खासगी व्यक्ती किंवा एजंटांविरुद्धही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.