आजपासून आठवडाभर चालणाऱ्या स्वच्छता अभियानात शिक्षकांनी हलगर्जी केल्यास भरारी पथकाच्या माध्यमातून पाहणी करून कारवाई करण्याचा इशारा देण्यात आल्याने जिल्हा परिषदेचा गुरुजी वर्ग घायकुतीस आल्याचे दिसत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छता अभियान भाजप नेतृत्वाखालील वर्धा जिल्हा परिषदेने चांगलेच मनावर घेतले आहे. आजपासून विविध उपक्रमांचा प्रारंभ करण्यात आला. आठवडाभरात शाळा विकासाच्या कार्यक्रमांवर भर दिला जाणार आहे. बालक दिन कार्यक्रमानंतर मॅरॅथॉन स्पर्धा, ग्रामगीता पठण, डेंग्यू निर्मूलन मानव श्रृंखला, बुद्धीबळ स्पर्धा, सामान्यज्ञान व वकृत्व स्पर्धा व अन्य उपक्रम चालणार आहे. केंद्राद्वारे निर्देशित कार्यक्रमांखेरीज हे उपक्रम आहेत. प्रत्येक शाळेतील उत्कृष्ट बालकाचा शेवटी सन्मान केला जाणार आहे.
वर्धा जिल्हा परिषदेत त्यांच्या अंतर्गत प्रत्येक शाळेला स्वत:चा स्वतंत्र गणवेश तयार करण्याची पूर्वीच मुभा दिली होती. त्यामुळे समारोपप्रसंगी रंगीबेरंगी गणवेषातील मुलांचा विशेष कार्यक्रम घेतला जाणार आहे. जि.प.शिक्षण सभापती मिलिंद भेंडे यांनी आज पत्रकार परिषदेतून माहिती देताना स्पष्ट केले की, या अभियानात हलगर्जी करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. त्यासाठी भरारी पथक नेमण्यात आले आहे. मुलांचा उपक्रमात सहभाग, उपक्रमाची अमलबजावणी, स्वच्छता, सामूहिक सहभाग, शिक्षकांचे वर्तन, कर्मचाऱ्यांचे सहकार्य, ग्रामगीता पठणातील गांभीर्य व अन्य पैलूंची तपासणी होईल. शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या सुटय़ा टाळण्यात आल्या आहेत. यात दिरंगाई करणाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देऊ. समाधानकारक खुलासा न मिळाल्यास प्रसंगी निलंबितही केले जाईल, असे भेंडे यांनी बजावले.