परभणी लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार विजय भांबळे यांच्या विरोधात प्रचार केल्याचा ठपका ठेवत तब्बल अर्धा डझन नेत्यांना कारवाईच्या नोटिसा राष्ट्रवादीने दिल्याने भविष्यातले राजकारण अनपेक्षित वळणावर गेलेले दिसेल. निकालाच्या ‘गजरा’आधीच कारवाईचे ‘काटे’ सलू लागल्याने राष्ट्रवादीतला नवा अंक वेगवान घडामोडींचा असेल. या घडामोडी निकालानंतर होतील. १६ मे रोजी निकाल पाहूनच हे सर्व नेते आपल्या भूमिका घेतील अशी परिस्थिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेहमीच गटबाजी असते आणि जिल्ह्यातील सर्व नेते एकाच वेळी एकत्र दिसण्याची शक्यता कमी असते. आपापल्या सोयीनुसार भूमिका घेतल्या जातात आणि त्यासाठी आपले मित्र व शत्रू निश्चित होतात. जे काल मित्र होते ते आज एकमेकाचे शत्रू होतात. यात प्रत्येक वेळी सहकलाकार बदलत राहतात. फौजिया खान जेव्हा मंत्रिपदी विराजमान झाल्या तेव्हा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांचे त्यांच्याशी सख्य होते. पुढे खान यांना पालकमंत्रिपदावरून हटवण्यासाठी माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर, आ.बाबाजानी, भांबळे हे तिघे एकत्र आले. पुढच्याच वळणावर नवीन अंक सुरू झाला. भांबळे यांचे नाव लोकसभेसाठी पुढे येताच वरपुडकरांनी खान यांचे नाव पुढे रेटले. भांबळे यांना उमेदवारी मिळू नये यासाठी वरपुडकर, खान यांनी संयुक्त प्रयत्न केले. भांबळे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वरपुडकरांचे उमेदवारीसंदर्भातले प्रयत्न थांबले. भांबळे यांच्याविरुद्ध जाहीर बोलायचे नाही, पण आपली भूमिकाही कार्यकर्त्यांना कळू द्यायची नाही, अशी दरम्यानच्या काळातली वरपुडकरांची शैली होती. प्रचारासंदर्भात प्रत्येक जाहीर कार्यक्रमांना ते उपस्थित राहिले. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला निवडून देण्यासंदर्भात त्यांनी व्यासपीठावरून भाषणेही केली. पण २००९ मधील लोकसभा निवडणुकीत झालेल्या आपल्या पराभवाला भांबळे यांचाही हातभार लागलेला आहे, ही गोष्ट वरपुडकर मतदानाच्या शेवटपर्यंत विसरले नाहीत. आता तर पक्षानेच त्यांच्यावर निवडणुकीच्या दोन दिवसांआधी कार्यकर्त्यांना धनुष्यबाणाचा प्रचार करण्यास सांगितल्याचा ठपका ठेवला आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीने एकदिलाने निवडणुका लढवायची भूमिका घेतल्यानंतर भांबळे यांच्या प्रचारात दोन्ही पक्ष हिरिरीने उतरतील आणि कोणतेही मतभेद राहणार नाहीत असे वाटले होते. प्रत्यक्षात आ. रामप्रसाद बोर्डीकर यांनी अपेक्षेप्रमाणेच भांबळे यांना विरोध करत शिवसेनेच्या पाठीशी आपली ताकद उभी केली. बोर्डीकर-भांबळे यांच्यातील वैर सर्वश्रुत असल्याने लोकांना बोर्डीकरांच्या भूमिकेचे आश्चर्य वाटले नाही. पण राष्ट्रवादीतूनच दगाफटका झाल्यानंतर मात्र कार्यकर्त्यांना आश्चर्य वाटले. आता तर पक्षानेच लोकसभा मतदारसंघातल्या तब्बल ६ ज्येष्ठ नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. राज्यमंत्री फौजिया खान, सुरेश वरपुडकर, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष विजय वरपुडकर, जि.प.चे उपाध्यक्ष समशेर वरपुडकर या जिल्ह्यातल्या चौघाजणांवर पक्षाने शिवसेनेला मदत केल्याचा ठपका ठेवला आहे. पक्षाने नोटीस बजावल्यानंतर वरपुडकरांची भूमिका काय असेल? पाथरी विधानसभा मतदारसंघात आपल्याला निवडणूक लढवायची आहे याची पूर्ण कल्पना असताना आणि त्या दृष्टीने तयारी चालवलेली असताना वरपुडकरांनी लोकसभा निवडणुकीत अशी भूमिका घेतली. याचा अर्थ त्यांनी आपली भविष्यातली वाटचाल स्वतंत्रपणेच राहणार, असेच सूचित केलेले असू शकते. भांबळे यांचा निकाल अनुकूल असो की प्रतिकूल असो, पण आपल्यावर जबाबदारी निश्चित होणारच आहे असाही विचार वरपुडकरांनी केला असण्याची शक्यता आहे. वरपुडकरांसारखा ज्येष्ठ नेता विचारपूर्वकच राजकीय निर्णय घेणार असे लोकांना वाटते. त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर कारवाईची नोटीस बजवावी, असा राजकीय व्यवहार त्यांच्याकडून लोकसभा निवडणुकीत झाला असेल तर मग पाथरीच्या उमेदवारीबाबत स्वत: वरपुडकरही पक्षाकडे आग्रही राहणार नाहीत किंबहुना पाथरीतून अपक्ष निवडणूक लढविण्याचीच त्यांची रणनीती असू शकते. खान या राज्यपालनियुक्त आमदार आहेत. दोन वेळा पक्षाने त्यांना संधी दिली. आता शिस्तभंगाची नोटीस पक्षाने खान यांच्यावर बजावली असल्याने त्यांना पुन्हा तिसऱ्यांदा संधी मिळण्याच्या शक्यतेपुढे प्रश्नचिन्ह लागले आहे. अशा वेळी खान यांची भूमिका काय असेल याबाबतही मोठे औत्सुक्य आहे. राष्ट्रवादीत विजय भांबळे, आ. बाबाजानी यांचा आज पक्षसंघटनेवर प्रभाव आहे, पक्षाच्या आजीमाजी मंत्र्यांनाही नोटिसा बजावल्या जाऊ शकतात हे मात्र जनतेसमोर आले आहे. ज्यांना नोटिसा बजावल्या आहेत ते आजच जाहीरपणे काही भूमिका घेतील असे अजिबात वाटत नाही. निकालानंतरच या सर्वाच्या भूमिका ठरतील.