ग्रामीण भागातील लोकांना स्वच्छ पाणी, आरोग्यविषयक सुविधा व महिलांच्या सक्षमीकरणासाठी अ‍ॅक्शन फॉर फूड प्रॉडक्शन (अ‍ॅफ्प्रो) या स्वयंसेवी संस्थेने स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी क्षेत्राच्या मदतीने विदर्भातील आत्महत्याग्रस्त बुलढाणा, यवतमाळ व वर्धा या तीन जिल्ह्य़ात एकीकृत प्रकल्प सुरू केला आहे.
ग्रामीण भागाच्या विकासासाठी राबणाऱ्या या संस्थेने विदर्भातील तीन जिल्ह्य़ांसह राज्यातील २५ गावांमध्ये एकीकृत प्रकल्प सुरू केला आहे. गावांमध्ये स्वच्छ पाण्याचा पुरवठा, शौचालये बांधणे, अन्नसुरक्षा, आरोग्य व सफाई व्यवस्थेवर जागरुकता करणे आणि कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देऊन स्वावलंबी समूहांना मजबूत करणे आदी उपक्रमांचा या प्रकल्पात समावेश आहे. विदर्भात या संस्थेने या महिन्याच्या प्रारंभी बुलढाणा जिल्ह्य़ातील पिंपळखुटा येथे प्रकल्पाचा शुभारंभ केला. या गावासह आजुबाजूच्या गावांतील नागरिकांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यासाठी ३३ लाख लीटर क्षमतेच्या सामूदायिक तलावाची निर्मिती केली आहे. पावसाचे पाणी या तलावात साठविले जात आहे. याच जिल्ह्य़ातील पांगरी गावात दोन माती बंधाऱ्यांची कामे करण्यात आली. यातून स्थानिक शाळांना विनामूल्य स्वच्छ पाणी उपलब्ध होणार आहे. पिंगळखुटा गावात शौचालयेही बांधण्यात येत आहेत.
वर्धा जिल्ह्य़ातील पडेगाव व आजुबाजूच्या गावांमधील रहिवाशांना आता स्वच्छ पिण्याचे पाणी मिळणार आहे. गावात ९० शौचालये बांधण्यात आली असून जलसंधारण व सफाई व्यवस्थेचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. गावांमधील पिण्याच्या पाण्याची परिस्थिती सुधारण्यासाठी उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यामुळे जलजन्य आजारांमध्ये घट होणार आहे. पाणी समस्या भेडसावत असलेल्या यवतमाळ जिल्ह्य़ातील मानपूर आणि आजुबाजूच्या गावांनाही या प्रकल्पांतर्गत स्वच्छ पाण्याचा पुरवठा होणार आहे. आरोग्यविषयक व्यवस्था व स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी यवतमाळमध्ये शौचालये बांधण्यात आली आहेत. मानपूर गाव हागणदारीमुक्त झाले आहे.
महिला सक्षमीकरण उपक्रमाचा एक भाग म्हणून मिरची व मसाला बनविणे, कपडे, स्टेशनरी व इतर सामुग्रीची दुकाने महिला केंद्रात सुरू करण्यात आली आहेत. यवतमाळात तीन स्वयं साह्य़ गट स्थापन करण्यात आले. यवतमाळ जिल्ह्य़ातील ग्रामपंचायतीला प्रशिक्षण देण्यात आले आहे. गरजेनुसार गावांमध्ये आरोग्य शिबिरे घेण्यात आली. या एकीकृत प्रकल्पासाठी ‘अ‍ॅफ्प्रो’ने मोन्सँटो इंडिया कंपनीची कल्याणकारी शाखा मोन्सँटो फंडची मदत घेतली आहे. दोन वर्षे कालावधीचा हा उपक्रम आहे. राज्यातील २५ गावांचा या उपक्रमात समावेश आहे. या प्रकल्पांतर्गत २१०० मीटर लांबीची जलवाहिनी जोडण्यात आली असून जमीन व जलसंधारण विकास उपक्रम राबविण्यावर विशेष लक्ष दिले जात आहे.