विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत कायदा-सुव्यवस्थेचे उल्लंघन कोणत्याही स्थितीत सहन केले जाणार नाही. पोलीस विभागाने कायदा-सुव्यवस्था अबाधित राखावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांनी दिले.
जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा निवडणुकीची कामे नियोजनबद्ध, तसेच सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने सर्व पोलीस उपअधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांची कार्यशाळा व आढावा बठक झाली. पोलीस अधीक्षक अनंत रोकडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी संभाजी झावरे, निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) महेश वडदकर, तसेच सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सिंह म्हणाले की, विधानसभा निवडणुकीची कामे नियोजनबद्ध व सुरळीत पार पाडण्यासाठी महसूल व पोलीस विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करावे. सामाजिक अपप्रवृत्तीच्या व्यक्तींवर वेळीच प्रतिबंधात्मक कारवाई करावी. निवडणूक शांततापूर्ण व निर्भय वातावरणात पार पाडण्यात येईल, असेही सिंह यांनी स्पष्ट केले.
भरारी पथकांतर्गत प्रत्येक मतदारसंघात तीन वा आवश्यकतेनुसार त्यापेक्षा जास्त पथके कार्यान्वित करण्यात येणार आहेत. त्यात वरिष्ठ कार्यकारी दंडाधिकारी पथकप्रमुख राहतील. वरिष्ठ पोलीस अधिकारी, तसेच ३ ते ४ सशस्त्र पोलीस व व्हिडिओग्राफर असेल. या पथकाने मतदारसंघात अनधिकृतपणे पैसे हस्तांतरण-वाटप, दारू व इतर संशयित वस्तूंचे वाटप यावर नियंत्रण ठेवावे. तसा शोध घेऊन कारवाई करणे अपेक्षित आहे.