पतंग उडवणाऱ्यांना सरकारचा इशारा   

अमरावती : चिनी बनावटीचे धोकादायक धागे, काच आणि लोखंडी कण वापरून तयार केलेला मांजा वापरल्यामुळे अनुसूचीतील वन्यप्राणी किंवा पक्ष्यांचा मृत्यू झाल्यास पतंग उडवणाऱ्यांवर वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

चिनी धागे, काचेचा चुरा आणि लोखंडाचे कण वापरून पतंगांचा मांजा बनवला जातो, अथवा तो तयार मिळतो. हा मांजा माणसांबरोबरच पक्षी आणि इतर वन्यजीवांसाठी घातक आहे. त्याच्या खरेदी आणि विक्रीवर प्रतिबंध घालण्याचे आणि वापराबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत.

मांजामुळे पशू-पक्ष्यांना होणाऱ्या दुखापतीच्या संदर्भात पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाने राज्य सरकारला पत्र पाठवले होते. हानीकारक मांजामुळे वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२च्या अनुसूचीतील वन्यप्राणी, पक्ष्यांचा मृत्यू झाल्यास किंवा त्यांना दुखापत झाल्यास वन कायद्याच्या कलम ९ नुसार संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परंतु या प्रकरणातील आरोपींना शोधण्याचे आव्हान वन विभागासमोर आहे.

मांजा वापराबाबत धोरण स्पष्ट नसल्याने खरेदी आणि विक्री करणाऱ्यांमध्ये संभ्रम असतो. आता वन विभागाने यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. मांजामुळे वन्यजीवांना दुखापत झाल्यास तो गुन्हा ठरणार आहे.

महावितरणचे आवाहन..

मकरसंक्रांतीनिमित्त पतंगोत्सव साजरा करताना उच्च आणि लघुदाब वीज वाहिन्या, फिडर आणि वीज यंत्रांपासून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. प्रामुख्याने शहरांसह ग्रामीण भागातही महावितरणच्या उच्च व लघुदाबाच्या वीज वाहिन्या, रोहित्रे आणि वीज यंत्रणा आहेत. त्यांच्या जवळच मुले पतंग उडवतात. अनेकदा पतंग  वीज वाहिन्यांमध्ये किंवा अन्य यंत्रांमध्ये अडकतात. पतंग काढताना अनेकदा अपघात घडतात. अडकलेल्या पतंगांमुळे शॉर्ट सर्किट होऊन बऱ्याच वेळा वीजपुरवठा खंडित होतो. नागरिक तसेच लहान मुलांनी वीज वाहिन्यांऐवजी सुरक्षित ठिकाणी, मोकळ्या मैदानात पतंगोत्सव साजरा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.