तारापूर औद्योगिक वसाहतीमधील सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडून (‘सीईटीपी’) कार्यक्षमतेने प्रक्रिया होत नसल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधित केंद्र बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या केंद्राशी संलग्न २२५ उद्योगांवर या आदेशाचा परिणाम होणार आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘एएम-२९’ या प्लॉटमध्ये असलेल्या जुन्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राला २९ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी सशर्त परवानगी देण्यात आली. तसेच नव्याने उभारण्यात येणाऱ्या ५० दशलक्ष घनमीटर क्षमतेच्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील २५ दशलक्ष घनमीटर क्षमतेच्या टप्प्यालाही प्रक्रिया सुरू करण्याची परवानगी देण्यात आली.

परंतु, जुन्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात मंडळाने नेमून दिलेल्या सांडपाणी नियम व निकषांचे उल्लंघन होत असल्याचे, तसेच मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात सीओडी (केमिकल ऑक्सिजन डिमांड)चे पाणी समुद्रात सोडले जात असल्याचे २२ नोव्हेंबर २०२० रोजी घेतलेल्या सांडपाण्याच्या नमुन्यात दिसून आले होते.

राष्ट्रीय हरित लवाद व सर्वोच्च न्यायालयाकडे दाखल करण्यात आलेल्या याचिकांच्या अनुषंगाने पर्यावरण रक्षणाबाबत आवश्यक ती खबरदारी घेतली जात नाही. तसेच सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील पहिल्या टप्प्यात अपेक्षित कार्यक्षमता प्राप्त झाली नसल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मत आहे. उद्योगांकडून प्रदूषित पाणी सोडण्यात येत असल्याने खाडी क्षेत्रातील पर्यावरणाला हानी पोहोचत आहे. जुन्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे नूतनीकरण २६ नोव्हेंबरपासून सुरू झाल्यानंतर त्या प्रकल्पाशी संलग्न उद्योगांनी त्यांकडून सांडपाणीनिर्मिती बंद करण्याचे नियोजित करणे आवश्यक असताना त्याचे उल्लंघन झाल्याचे दिसून आल्याचे आदेशात म्हटले आहे.

आदेशात काय?

* औद्योगिक वसाहतीमधील उद्योगांकडून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याच्या दर्जावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी संगणकीकृत ऑनलाइन यंत्रणा बसवणे बंधनकारक करण्यात आले होते, मात्र त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचे आदेशात अधोरेखित करण्यात आले आहे.

* तसेच जुन्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील सुधारणा केलेल्या पहिल्या टप्प्यातून होणाऱ्या पाण्याचा प्रक्रियेच्या दर्जामध्ये अपेक्षित सुधारणा होत नसल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाने संपूर्ण जुनी ‘सीईटीपी’ बंद करण्याचे आदेश काढताना म्हटले आहे.

* या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजेंद्र राजपूत यांनी सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद करण्याचे आदेश १२ जानेवारी रोजी जारी केले. तसेच या केंद्रात कोणत्याही प्रकारचे सांडपाणी न स्वीकारण्याच्या सूचना दिल्या आहेत.

* परिणामी या प्रकल्पाशी जोडलेल्या २२५ हून अधिक उद्योगांना त्यांचे उत्पादन बंद ठेवावे लागणार आहे. जुन्या ‘सीईटीपी’मध्ये सुधारणा होईपर्यंत किंवा या उद्योगांची नव्या ‘सीईटीपी’शी जोडणी होईपर्यंत या उद्योगांवर संक्रांत ओढवली आहे.

जुन्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रात सुधारणा करण्यासाठी नोव्हेंबरअखेरीपासून केंद्र बंद करण्यात आले. त्यामुळे या केंद्राशी निगडित सर्व उद्योग बंद ठेवण्यात आले होते. उद्योगातील शौचालय व मानवी वापरातून निघणारे सांडपाणी ‘सीईटीपी’मध्ये येत असल्याने त्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने आक्षेप नोंदवला आहे. नवीन २५ दशलक्ष घनलिटर प्रतिदिन क्षमतेचा ‘सीईटीपी’ तारापूरच्या ओएस ३० प्लॉटमध्ये कार्यरत असून या ठिकाणी ११ दशलक्ष घनमीटर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. उर्वरित उद्योगांमधील सांडपाणी नवीन ‘सीईटीपी’सोबत जोडणी करण्यास एमआयडीसी असमर्थ ठरल्याने येथील दोनशे ते अडीचशे उद्योगांना या आदेशाचा फटका बसणार आहे.

– डी.के. राऊत, अध्यक्ष टीमा (उद्योजकांची संस्था)