26 September 2020

News Flash

तारापूरच्या १५ उद्योगांवर कारवाई

पाच-सहा महिन्यांपूर्वी केलेल्या पाहणीच्या आधारावर कारवाई

संग्रहित छायाचित्र

उत्पादन बंद करण्याचे आदेश; सहा महिन्यांपूर्वीच्या पाहणीच्या आधारे कारवाई केल्याने उद्योजकांत नाराजी

करोना संक्रमणाच्या वातावरणात रुतलेल्या अर्थचक्राला गती देण्याचे काम शासनाकडून केले जात असतानाच प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून तारापूर औद्योगिक वसाहतीमधील किमान १५ उद्योगांना उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे पाच-सहा महिन्यांपूर्वी केलेल्या पाहणीच्या आधारावर ही कारवाई केल्याने उद्योजकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.

करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन महिन्यांपासून अत्यावश्यक सेवा वगळता अधिकांश उद्योगधंदे बंद आहेत. गेल्या काही दिवसांपासून उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी शासन प्रयत्नशील असताना तारापूर येथील २० पेक्षा अधिक उद्योगांना प्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्याच्या अनुषंगाने उत्पादन बंद का करण्यात येऊ  नये, अशा स्वरूपाच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या उद्योगांनी प्रदूषण नियंत्रण उपकरणांमध्ये अपेक्षित बदल करून सांडपाणी प्रक्रियेचा दर्जा उंचावण्याची सूचना करण्यात आली आहे.

अखिल भारतीय मांगेला समाजातर्फे राष्ट्रीय हरित लवादाने दाखल केलेल्या एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान लवादाने तारापूर औद्योगिक वसाहतीमधील सर्व प्रदूषणकारी उद्योगांची पाहणी करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने नोव्हेंबर २०१९ ते जानेवारी २०२० च्या दरम्यान येथील ६९० उद्योगांची विशेष पथकाद्वारे पाहणी करण्यात आली होती. या पाहणीनंतर काही उद्योगांवर उत्पादन बंद करण्याची कार्यवाही करण्यात आली होती. मात्र तारापूरमधील प्रदूषणामुळे पर्यावरणाची झालेल्या हानीचा अंदाज घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या समितीच्या कामात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व्यग्र राहिल्याने उद्योगांवरील कारवाई मागे पडली, असे प्रदूषण नियंत्रण विभागाकडून सांगण्यात येत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने केलेल्या पाहणीचा अहवाल प्राप्त झाल्याने संबंधित उद्योगांवर कारवाई करणे आवश्यक असल्याची भूमिका प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली आहे.

काही उद्योगांना कारणे दाखवा नोटीस, तर काही उद्योगांना उत्पादन बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. प्रदूषण नियंत्रण व्यवस्था कार्यरत आणि कार्यक्षम केल्यानंतर तसेच नोटिशीमध्ये दिलेल्या मुद्दय़ांची पूर्तता केल्यानंतर अशा उद्योगांना तातडीने उत्पादन पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात येईल, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

उद्योजकांची तीव्र नापसंती

करोनाच्या पाश्र्वभूमीवर देशात टाळेबंदी लागू झाल्याने औद्योगिक क्षेत्र बंद करण्यात आले होते. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वीच्या पाहणीच्या अनुषंगाने ही कारवाई करण्याचे हाती घेतल्याने त्याबाबत औद्योगिक क्षेत्रांमध्ये तीव्र नापसंती व्यक्त करण्यात येत आहे. टाळेबंदीच्या काळात बहुतांश उद्योग बंद असल्याने लाखो कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असताना तसेच नव्याने उद्योग सुरू करताना उद्योजकांसमोर अनेक अडचणी समोर येत असताना या कारवाईमुळे संकट निर्माण झाल्याचे उद्योजकांनी सांगितले.

पुन्हा प्रदूषणाचा खेळ

टाळेबंदीत औद्य्ोगिक कारखाने सुरू करण्याची मुभा मिळाल्याने तारापूरमधील काही कारखान्यांनी प्रदूषण करणे सुरू ठेवले आहे. रात्रीच्या वेळी काही कारखान्यातील रासायनिक सांडपाणी थेट नाल्यात सोडले जात असल्याचे उघडकीस आली आहे. संचारबंदीत मोकळा श्वास घेणाऱ्या नागरिकांना आता पुन्हा प्रदूषणाची झळ सोसावी लागत आहे. तारापूर औद्य्ोगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यांनी प्रदूषणाची सुरुवात पुन्हा केली आहे. येथील काही रासायनिक कारखाने रात्रीच्या वेळी कारखान्याच्या समोरील नाल्यात रासायनिक सांडपाणी सोडत असल्याचे दिसून आले आहे. टाळेबंदीमुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर परिणाम झाला असून याचा फायदा कारखानदार घेताना दिसून येतात.

प्रदूषणकारी कारखान्यांवर कारवाई होणे गरजेचे असून तपासणीमध्ये दोषी आढळलेल्या कारखान्यांवर कारवाई केली आहे. कारखान्यांना ज्या कारणांमुळे उत्पादन बंदचे आदेश दिले आहेत, त्यामध्ये सुधारणा केल्यानंतर कारखाने सुरू करण्याबाबत परवानगी दिली जाईल.

– राजेंद्र राजपूत, प्रादेशिक अधिकारी, प्रदुषण नियंत्रण मंडळ, ठाणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 12:04 am

Web Title: action on 15 industries of tarapur abn 97
Next Stories
1 तलासरीत चार दिवस बाजारपेठा बंद
2 उत्तर प्रदेशात जाण्यासाठी गोंधळ कायम
3 पालघर ग्रामीणमध्ये दहा नवीन करोना रुग्ण
Just Now!
X