विद्यार्थी वाहतूक करताना सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणार्‍या २२५ स्कूल बसेसवर जळगाव उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे कारवाई करण्यात आली. या कारवाईत २२ वाहनचालकांचा नोंदणी परवाना रद्द करण्यात आला असून कारावाईच्या अनुषंगाने ४२ हजार ६८४ रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून एप्रिल २०१६ ते ३० जून २०१७ या कालावधीत स्कूल बस वाहनांच्या तपासणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. यात २२५ वाहने दोषी आढळून आली. त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करून न्यायालयीन दंड १६ हजार रुपये, कार्यालयीन सहमत शुल्क २३ हजार ८०० रुपये तर करापोटी २ हजार ८८४ असे एकूण ४२ हजार ६८४ रुपये वसूल केले. तसेच २२ वाहनांचे नोंदणी आणि परवाना रद्द करण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी स्कूलबसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत, शाळेच्या आवारातच विद्यार्थी उतरवावे आणि बसवावेत, शाळा सुटण्याच्या वेळेत कर्मचारी, शिक्षक नियुक्त करावे, जास्त वाहतूक करणार्‍या वाहनातून विद्यार्थ्यांना पाठवू नये, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी केले आहे.