सोलापूर जिल्हय़ात होणा-या वाळूतस्करीवर परिणामकारक आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांच्या प्रशासनाने कठोर पावले उचलत गेल्या पंधरा दिवसांत ३५० वाळू वाहतुकीच्या मालमोटारी पकडून सहा कोटी २५ लाखांची दंडात्मक कारवाई केली आहे. सर्वाधिक कारवाई मंगळवेढा व करमाळा तालुक्यात झाल्याचे दिसून आले.
जिल्हय़ात वाळूतस्करी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस पावले उचलत असताना वाळूतस्करांच्या हस्तकांकडून प्रांत व तहसीलदारांच्या हालचालींवर अहोरात्र पाळत ठेवली जात असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध सहा ते सात गुन्हेही दाखल झाले आहेत. परंतु तरीदेखील प्रांत व तहसीलदारांच्या पाळतीवर वाळूतस्करांचे हस्तक असतात. सकाळी प्रांत किंवा तहसीलदार निवासस्थानातून बाहेर पडताच त्यांच्या पाठोपाठ वाळूतस्करांचे हस्तक पाळतीवर असतात. हे अधिकारी कोठे जातात, त्याची माहिती लगेचच पुढे इतर हस्तकांना कळवली जाते. या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी मुंडे यांनी अधिका-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहात वाळूतस्करांच्या विरोधातील कारवाईचा बडगा सुरूच ठेवला आहे. नव्हे तर तो अधिक परिणामकारक केल्याचे दिसून येते.
करमाळा तालुक्यातील खातगाव येथे मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात वाळू वाहतूक केल्यामुळे वाळू ठेकेदार व त्यांच्या ताब्यातील २१० मालमोटारींवर कारवाई करण्यात आली असता त्यापैकी बरीच वाहने परस्पर पळवून नेल्याचे दिसून आल्यामुळे जिल्हा प्रशासन अधिक कठोर बनले. त्यातून दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला गेला. शासनाने जिल्हा प्रशासनाला कारवाईसाठी जादा अधिकार दिले आहेत.