महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संघटनेच्या असहकार आंदोलनास राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील कर्मचा-यांनी पाठिंबा दिला म्हणून जिल्ह्यातील ६७ जणांवर कारवाई करण्यात आली. राज्यात साता-यात सर्वप्रथम ही कारवाई करण्यात आली.
राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संघटनेचे राज्यव्यापी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनास राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमात काम करणा-या सेवकांनीही पािठबा दिला आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या आणि कामावर न आलेल्या सर्वाना जिल्हा परिषदेच्या वतीने कामावर रुजू होण्याचे आदेश दिले गेले होते. तसेच नोटीस ही देण्यात आली होती, मात्र या कर्मचा-यांनी  या नोटिशीकडे लक्ष दिले नाही. परिणामी ६७ जणांना कामावरून कमी करण्यात आले आहे. हे कर्मचारी अस्थायी स्वरूपात कामावर होते.
दरम्यान, वैद्यकीय अधिकारी संपावर गेल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. होमिओपॅथी डॉक्टर्सनी शासनाला मदतीचे आश्वासन दिले आहे, मात्र वैद्यकीय अधिका-यांनी सरकार आपल्यात फूट पाडत असल्याने कामावर जाऊ नका असे आवाहन केले असून रुग्णांना होणा-या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.