द्रुतगती मार्गावर वाहनांचा अतिवेगच अपघातांना कारणीभूत

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहनांचा अतिवेगच जीवघेणा ठरत असल्याचे मंगळवारी कामशेतजवळ झालेल्या अपघातावरून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. अतिवेगामुळे गाडीवरील नियंत्रण सुटून मंगळवारी पहाटे झालेल्या अपघातात पुण्यातील सहा तरुणांना जीव गमवावा लागला. दहाच दिवसांपूर्वी १७ जुलै रोजी याच ठिकाणी झालेल्या कार अपघातात पुण्यातील तिघांचा मृत्यू झाला होता. हे दोन्ही अपघात अतिवेगाने गाडी चालवण्याच्या प्रकारामुळेच झाले आणि पोलिसांकडून कारवाई सुरू असूनही बेशिस्त कमी होत नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून द्रुतगती मार्गावर पोलिसांनी विशेष कारवाई मोहीम राबवत वेग मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या ६५५ वाहनांवर कारवाई करून एक लाख ३१ हजार रुपये एवढा दंड वसूल केला. तसेच मार्गिकेची शिस्त मोडणाऱ्या तब्बल ७,६१६ वाहनांवर कारवाई करत सात लाख ६५ हजार ५०० रुपये एवढा दंड वसूल केला. द्रुतगती मार्गावर एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर कारवाई सुरू असताना देखील वाहनचालकांचा बेशिस्तपणा कोठेही कमी होताना दिसत नसल्याने महामार्गावर अपघातांची व मृतांची संख्या वाढत आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहनांची वेग मर्यादा प्रतिताशी ८० किलोमीटर एवढी ठेवण्यात आली असली, तरी या मार्गावर सरासरी ताशी १०० ते १५० किलोमीटर एवढय़ा वेगाने वाहने चालवली जातात. काही वाहनांचा वेग तर त्याहून अधिक असतो. अतिवेगातील वाहनांवर बऱ्याचदा नियंत्रण मिळविता येत नसल्याने गंभीर स्वरूपाचे अपघात वाढले आहे.

कारवाई- १ जून ते २५ जुलै

  • वेग मर्यादेचे उल्लंघन- ६५५ वाहनांवर कारवाई
  • मार्गिका सोडणाऱ्या ७ हजार ६१६ वाहनांवर कारवाई
  • ताशी मान्य वेगमर्यादा ८० किलोमीटर