कराड तालुक्यातील बहुचर्चित वडोली भिकेश्वर येथील बेकायदा वाळू उपशावर कराडचे प्रांताधिकारी किशोर पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वाळूचे बेकायदा सुमारे ५० हून अधिक वाफे उद्ध्वस्त करताना, मोठी यंत्रसामग्री जप्त केली आहे. त्यात पोकलँड, जेसीबी, वाळूने भरलेले व रिकामे सुमारे १०० ट्रक , यांत्रिकी बोटी अशी कोटय़वधी रुपयांची वाळू उपसा करणारी व वाहतूक करणाऱ्या यंत्रसामग्रीचा समावेश असल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली. महसूल खात्याची ही आजवरची सर्वात मोठी कारवाई असून, वाळूसम्राटांचे धाबे दणाणून गेले आहेत.
प्रांताधिकारी किशोर पवार यांनी पोलीस, परिवहन व महसूल खात्याच्या मदतीने ही कारवाई फत्ते केली. कृष्णा नदीतील बेकायदा वाळू उपशांसंदर्भात स्थानिक जनतेने मोठय़ा धाडसाने लेखी तक्रारी केल्या होत्या. तर, प्रसारमाध्यमांनीही अनेकदा या बेकायदा वाळू उपशावर प्रकाश टाकला होता.
मात्र, ठोस कारवाई होत नव्हती. परिणामी महसूल खात्याकडे संशयाची सुई जात होती. मात्र, आजच्या कारवाईने वाळू सम्राटांचे धाबे दणाणून सोडले. तर, महसूल खात्यातील काही जणांनाही हा दणकाच असल्याचे बोलले जात आहे.
वडोली येथील कृष्णा नदी पात्रातून बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या अड्डय़ावर प्रांत व तहसीलदारांच्या पथकाने छापा मारताच वाळू ठेकेदार व तेथील कर्मचाऱ्यांनी पळ काढला. यावर जेसीबी व पोकलँडच्या साहाय्याने एकापाठोपाठ एक वाळू वाफे उद्ध्वस्त करून वडोली, धनकवडी तसेच उंब्रज जवळच्या पाणवठय़ावरील वाळू उपसा करणाऱ्या बोटी, वाळू वाहतूक करणारे ट्रक पोकलँड, जेसीबी अशी कोटय़वधी रुपयांची यंत्रसामग्री प्रशासनाने जप्त केल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली. जप्त केलेली ही यंत्रसामग्री कराडच्या शासकीय गोडावून परिसरात आणून लावण्यात आली आहे.