गर्दीच्या वेळी डहाणूसाठी जादा उपनगरी गाडय़ांची सोय करण्याची मागणी

पश्चिम रेल्वेवर संध्याकाळच्या वेळी विरारपल्याड पालघर, डहाणूमध्ये जाण्यासाठी पुरेशा उपनगरी गाडय़ा (लोकल) नसल्याने अनेक प्रवासी लांब पल्ल्यांच्या गाडय़ांमधून प्रवास करतात. मात्र या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यास पश्चिम रेल्वे प्रशासनाने सुरुवात केली आहे. त्यामुळे लांब पल्लय़ांच्या गाडय़ांमध्ये मासिक तिकीटधार प्रवाशांसाठी किमान दोन डब्यांची सुविधा असावी आणि गर्दीच्या वेळी दादर, अंधेरी व बोरिवली येथून डहाणूसाठी उपनगरी गाडय़ांची सोय करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून डहाणू, बोईसर, पालघर, सफाळे आदी ठिकाणांहून शेकडो प्रवासी लांब पल्लय़ांच्या गाडय़ांमधून प्रवास करीत आहेत. आरक्षित प्रवाशांची गैरसोय होत असल्याने तसेच या संदर्भात तक्रारी दाखल केल्यानंतर पश्चिम रेल्वेकडून सायंकाळी मुंबईहून सुटणाऱ्या सौराष्ट्र जनता एक्स्प्रेस आणि लोकशक्ती एक्स्प्रेस या गाडय़ांमध्ये गेल्या आठवडाभरापासून विशेष पथकामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येत होती. प्रवाशांकडून ३५० ते ४०० रुपयांची दंडात्मक रक्कम वसूल केली जात असल्याने दैनंदिन प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

गर्दीच्या वेळी दादर, अंधेरी व बोरीवली येथून डहाणूसाठी थेट लोकल सोडण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून पश्चिम रेल्वेकडे करण्यात येती होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने लांब पल्ल्याच्या गाडीने प्रवास करावा लागत असल्याचे काही प्रवाशांनी सांगितले. यासंदर्भात विविध प्रवासी संघटनांनी पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन या कारवाईबाबत प्रवाशांची भूमिका मांडली.