23 September 2020

News Flash

रास्त भाव दुकानांसाठी फेरजाहीरनामे

अनेक दुकानांवर पुरवठा विभागाकडून कारवाई

अनेक दुकानांवर पुरवठा विभागाकडून कारवाई

नीरज राऊत, लोकसत्ता

पालघर : पालघर तालुक्यातील रास्त धान्य दुकाने आणि किरकोळ केरोसीन दुकानांतील अनियमिततेची पालघरच्या पुरवठा विभागाने गंभीर दखल घेतली आहे. ८०हून अधिक दुकानांवर पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे. सद्य:स्थितीत ११० दुकानांचे फेरजाहीरनामे प्रसिद्ध करण्यात आले आहेत. महिला बचत गटांनी ही दुकाने चालवण्यासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी पुरवठा विभाग प्रयत्नशील आहे.

पालघर तालुक्यात २१८ रास्त धान्य दुकाने होती. मात्र, काही दुकानदारांनी राजीनामा दिल्याने, तसेच काही दुकानांत अनियमितता आढळल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे सध्या १३८ दुकानांमधून रास्त धान्य वितरण होत आहे. काही संस्था आणि दुकानांमध्ये एकापेक्षा अधिक वितरण केंद्रे दिली गेल्याने, तसेच बंद असलेल्या दुकानांचा भार सुरू असलेल्या दुकानांवर पडत असल्याने संपूर्ण यंत्रणा सध्या ताणाखाली आहे. तशी कबुली पुरवठा विभागाचे अधिकारी देत आहेत.

प्रत्येक गावात एका व्यक्तीला वा संस्थेला एक दुकान असावे, तसेच अधिकाधिक रास्त धान्य दुकाने असावीत या उद्देशाने पालघर तालुका पुरवठा विभागाने ११० नवीन दुकानांसाठी जाहीरनामे प्रसिद्ध केले आहेत. यात ४३ रास्त भाव दुकाने, ५८ किरकोळ केरोसीन वितरण केंद्रे आहेत, याशिवाय नऊ  केंद्रांमध्ये रास्त भाव दुकानदार आणि केरोसीन वितरणाची संयुक्त सुविधा आहे. ही दुकाने बचत गट वा महिला सहकारी संस्थांनी चालविण्यासाठी घ्यावीत यासाठी पुरवठा विभाग प्रयत्नशील आहे. इच्छुक महिला बचत गटांनी अर्ज १२ सप्टेंबपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह सादर करावे यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

वक्तशीरपणाबाबत सक्त ताकीद

पालघर शहरासह तालुक्यातील विविध ठिकाणी रास्त भाव धान्य दुकानदार त्यांच्या मर्जीने दुकान उघडत असल्याने अनेकदा धान्य आणि केरोसीन घेण्यासाठी येणाऱ्या लाभार्थी महिलांना आणि नागरिकांना रोजंदारीला मुकावे लागते. याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ही सर्व दुकाने सकाळी आठ ते दुपारी १२ तसेच दुपारी दोन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यासाठी तालुका पुरवठा अधिकाऱ्यांनी दुकानदारांना सक्त सूचना दिल्या आहेत. याशिवाय रास्त धान्य दुकानांमधील विविध धान्य साठा आणि केरोसीनच्या साठय़ाची माहिती सूचना फलकावर ठळकपणे प्रसिद्ध करावी तसेच काही कारणास्तव दुकाने काही काळ बंद राहणार असल्यास त्याची आगाऊ  सूचना प्रसिद्ध करावी, असेही संबंधितांना सूचित करण्यात आले आहे. करोनाकाळात एका दुकानातील लाभार्थी अन्य जवळच्या दुकानात जाऊन धान्य विकत घेऊ  शकेल अशी व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे.

रास्त भाव धान्य दुकान फेर जाहीरनामा

* माहीम, हरणवाडी, मांडे, पास्थळ, बेटेगाव, पडघे, नागझरी, तारापूर, सफाळे, तारापूर, मनोर, बहाडोली, वांजोळी यांच्यासह एकूण ४३ ठिकाणी किरकोळ केरोसीन दुकाने

* पालघर, नवली, सातपाटी, केळवा बाजार, माहीम, दातिवरे, कोरे, वेढी, एडवण, बोईसर, पास्थळ, कलवडे, आलेवाडी, उमरोळी, पंचाळी, मनोर, टेण, गोवाडे यांच्यासह ५८ ठिकाणी  दुकान, किरकोळ केरोसीन परवाना एकत्रित

* पालघर, आगरवाडी, कमारे, नेवाळे, तारापूर, लालठाणे, आंभाण, बोट, ढेकाळे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2020 1:14 am

Web Title: action on ration shops and retail kerosene stores by supply department due to irregularities zws 70
Next Stories
1 पुलाच्या मागणीकडे शासनाचे २० वर्षे दुर्लक्ष
2 यंत्र अपघातात हात, बोटे निकामी झालेले कामगार वाऱ्यावर
3 ८२ गावांना जलदिलासा
Just Now!
X