काल गुरुवारी साजरी झालेल्या शिवजयंतीच्या मिरवणुकीत डॉल्बीचा प्रचंड दणदणाट झाला तरी त्यावर पोलीस प्रशासनाने वेळीच खंबीर पावले न उचलता दुस-या दिवशी, शुक्रवारी विविध पाच मंडळांच्या पदाधिका-यांवर खटले दाखल केले. दहावी व बारावीच्या परीक्षा तोंडावर येऊन ठेपल्या असताना अभ्यासात मग्न असणा-या विद्यार्थ्यांना शिवजयंती मिरवणुकीत डॉल्बीच्या अतिरेकी वापराचा असहय़ त्रास झाला.
चार हुतात्मा पुतळय़ांजवळ शिवजयंती साजरी केलेल्या शिवप्रकाश प्रतिष्ठान शिवजन्मोत्सव मंडळाने प्रचंड ध्वनिप्रदूषण वाढवणा-या डॉल्बी सिस्टिमचा मोठय़ा प्रमाणात वापर करून स्थानिक नागरिकांचे जीवन असहय़ करून सोडले. सुमारे सहा-सात तास डॉल्बीचा धुमाकूळ सुरू होता. या प्रदूषणाचा त्रास जसा नागरिकांना सहन करावा लागला, तसा लगतच्या हुतात्मा बागेसह किल्ला बाग व खंदक बाग या  तिन्ही बागांतील पक्ष्यांनाही त्याचा फटका बसल्याचे दिसून आले. यात प्रदूषण वाढून पर्यावरण धोक्यात आले असताना तेथे बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस अधिका-यांनी सुरुवातीपासून बघ्याची  भूमिका घेतल्याचे पाहावयास मिळाले. आश्चर्य म्हणजे या वेळी सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांच्यासह कोल्हापूरच्या करवीर संस्थानचे श्रीमंत युवराज मालोजीराजे छत्रपती आदींची उपस्थिती     होती. या ध्वनिप्रदूषणाबद्दल युवराज मालोजीराजे यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. दरम्यान, याप्रकरणी दुस-या दिवशी या मंडळाचा अध्यक्ष संतोष दत्तू चव्हाण (रा. हेरिटेज रेसिडेन्सीमागे, लष्कर, सोलापूर) याच्यासह इतर पदाधिकारी तसेच डॉल्बीचालक संदीप नरसू दत्तू (रा. सोलापूर) याच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलिसांनी ध्वनिप्रदूषण नियंत्रण व पर्यावरण संरक्षण कायदा कायद्याखाली खटला दाखल केला. अशाच स्वरूपाची कारवाई श्रीराम प्रतिष्ठान (टिळक चौक) व जुनी पोलीस लाईन सार्वजनिक तरुण मंडळाविरुद्ध करण्यात आली. याशिवाय जोडभावी पेठ पोलिसांनी अन्य दोन मंडळांच्या पदाधिका-यांसह संबंधित डॉल्बीचालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.