बोईसरजवळील सरावली भागातील सरकारी जागेवर उभारलेल्या अनधिकृत बांधकामावर महसूल विभागाने धडक कारवाईचे सत्र सुरू ठेवले आहे. शुक्रवारी येथील एका इमारतीच्या १८ सदनिका तोडण्यात आल्या. या वेळी काही जणांनी कारवाईच्या कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. नंतर पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. आठवडय़ापूर्वी आठ अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली होती.

महसूल विभागाने मागच्या आठवडय़ात सरावलीच्या अवधनगर भंगार गल्ली भागात केलेल्या कारवाईनंतर कारवाई झालेल्या ठिकाणी दोन दिवसांतच पुन्हा अनधिकृत बांधकाम उभे राहिले होते. याबाबत बोईसर मंडळ अधिकारी यांना समजताच शुक्रवारी त्यांनी या ठिकाणी पुन्हा कारवाईचा मोर्चा वळवला. पालघर तहसीलदार सुनील शिंदे यांनी तातडीने बोईसरमध्ये येत धडक कारवाई सुरू केली. या ठिकाणी सरावलीचे उपसरपंच यांच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर फिरविण्यात आला. खुद्द लोकप्रतिनिधी यांच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केल्याने इतर भूमाफियांचे धाबे दणाणले होते. अवधनगरभंगार गल्लीत भागात आठ दिवसांपूर्वी एका अनधिकृत बांधकामावर कारवाई केली होती. मात्र या ठिकाणी पुन्हा बांधकाम उभे करून दुकाने थाटण्यात आली होती. या ठिकाणी तहसीलदार यांनी पुन्हा कारवाई करत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. कारवाईदरम्यान काही राजकीय पार्श्वभूमीच्या मंडळींनी कारवाईमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता. तसेच तहसीलदार व त्यांच्या सहकाऱ्याना घेराव घालण्यात आला होता.

मात्र तातडीने पोलीस बंदोबस्त दाखल झाल्यानंतर अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरूच राहिली. बोईसर परिसरात अनधिकृत बांधकामे ही करोना टाळेबंदीच्या काळात उभी राहिली होती.

अरेरावी मोडीत

तहसीलदार यांनी गेल्या आठवडय़ात याच काही भागात कारवाई केल्यानंतर  तोडलेल्या दुकानाची दुरुस्ती करून पुन्हा तिकडे दुकाने थाटली होती. भूमाफियांची दादागिरी व अरेरावीपणा पालघरच्या तहसीलदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोडून काढला.