प्रशांत देशमुख

मुख्यालयात गैरहजर राहणाऱ्या जिल्हा परिषदेच्या २२ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी एकाचवेळी कारवाईचा बडगा उगारल्याने खळबळ उडाली आहे.

कर्मचारी अथवा अधिकारी मुख्यालयात हजर नसतात अशा जनतेच्या नेहमीच्या तक्रारी आहेत. त्यातच करोना साथीच्या आणि संचारबंदीच्या काळात कार्यालयात वेळेवर हजर राहून दैनंदिन कामकाजात पूर्णवेळ सहभाग नोंदवण्याचे स्पष्ट आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आले होते. मात्र, या आदेशांनाही दाद न देणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीसा देण्यात आल्या होत्या.

बाहेरगावावरून मुख्यालयात ये‑जा करणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी तीन पडताळणी पथक स्थापन केले होते. जिल्ह्यातील आठही तालुक्यात या पथकाने प्रत्यक्ष पाहणी केली. पंधरा दिवसांपूर्वी त्यात आठ कर्मचारी गैरहजर आढळले होते. या कर्मचाऱ्यांवर वार्षिक वेतनवाढ रोखण्याची कारवाई झाली होती. मात्र, या कारवाईपासूनही धडा न घेता कामावर दांड्या मारणारे आणखी कर्मचारी आढळून आले आहेत. आज पडताळणी पथकाच्या भेटीत गैरहजर आढळलेल्या या कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली.

कारवाई झालेले अधिकारी आणि कर्मचारी

कारजा तालुका आरोग्य अधिकारी एस. एस. रंगारी, सहाय्यक अभियंता यु. एच. दंदे, सांख्यिकी अधिकारी एल. जी. भोंबे, पर्यवेक्षिका रंजना जवादे, शिक्षणविस्तार अधिकारी अशोक कांबळे, वरिष्ठ सहाय्यक वाय. ए. दरणे, आरोग्य सहाय्यक टी. एम. राठोड व घनश्याम जिवतोडे (सर्व कारंजा पंचायत समिती), समुद्रपूर पंचायत समितीचे पशूधन पर्यवेक्षक प्रीतमकुमार दडमल, वरिष्ठ सहाय्यक प्रशांत मंडके, कनिष्ठ सहाय्यक एस. बी. लोहकरे (सर्व समुद्रपूर पंचायत समिती) ग्रामसेवक एम. व्ही. पाठक, आर. वी. खरडे, बी. जी. गवई, ए. डी. उतखेडे, कनिष्ठ सहाय्यक लक्ष्मी फोडेकर व यु. जे. कदम, पर्यवेक्षिका आरती चिकटे, ग्रामसेवक काशीनाथ शेकापुरे (सर्व आष्टी पंचायत समिती), हिंगणघाट पंचायत समितीच्या द्वितीय श्रेणी अधिकारी प्रभा दुपारे व शाखा अभियंता पी. एन. कुंभारे या अधिकाऱ्यांवर कामावर गैरहजर राहिल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.