राज्याचे माजी महसूल मंत्री आणि भाजपचे नेते एकनाथ खडसे यांच्याविरोधातील खटले मागे घ्यावेत, यासाठी पाकिस्तानातून धमकीचा फोन आल्याचा दावा करत आम आदमी पक्षाच्या माजी नेत्या अंजली दमानिया यांनी खळबळ उडवून दिली आहे. पाकिस्तानातून हा फोन आला असून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे त्यांनी सांगितले. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास आपल्याला हा फोन आला होता, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

दमानिया यांनी या धमकीच्या दूरध्वनी क्रमांकाचे स्क्रीनशॉट्स ट्विटरवर शेअर केले आहेत. ट्रू कॉलर अॅपवर हा क्रमांक ‘दाऊद २’ या नावाने दाखवण्यात येत आहे. या प्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही याबाबत माहिती दिली आहे. सहपोलीस आयुक्त या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दरम्यान, एका कार्यक्रमात दमानियांविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात खडसेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दमानियांच्या तक्रारीनुसार, खडसे यांनी आपल्याबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केला. जळगावमधील त्यांच्या सहकाऱ्यांनी याबाबत आपल्याला माहिती दिली होती, असे दमानियांनी नमूद केले होते. या प्रकरणी खडसेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी दमानियांच्या समर्थकांनी केली होती.