स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडली असून त्यांचे अधिकृत उमेदवार जालिंदर जाधव यांनी भाजपचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना पाठिंबा दिला आहे, तर तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे उमेदवार लहू कानडे यांना पाठिंबा दिला आहे. खासदार राजू शेट्टी यांची या निर्णयामुळे नाचक्की झाली आहे.
भाजपने श्रीरामपूरची जागा स्वाभिमानीला सोडली होती, पण ऐनवेळी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना प्रवेश देऊन भाजपने त्यांना उमेदवारी दिली. स्वाभिमानीमध्ये उमेदवारी देण्यावरून वाद होता. श्रीरामपूर तालुक्यातील कार्यकर्ते हे प्रभाकर कांबळे यांना तर राहुरीचे कार्यकर्ते जाधव यांना उमेदवारी देण्याचा आग्रह धरत होते. अखेर प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी जाधव यांना एबी फॉर्म दिला. कांबळे यांनी अर्ज मागे घेतला. आता जाधव रिंगणात असले तरी त्यांनी माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या विनंतीवरून वाकचौरे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे स्वाभिमानीचा उमेदवार निवडणूक रिंगणात नाही. खासदार शेट्टी यांनी भाजपबरोबर युती केली आहे. तालुक्यातील कार्यकर्ते गेल्या ८ दिवसांपासून अलिप्त होते. पण आता स्वाभिमानीचे जितेंद्र भोसले, सुरेश ताके, रामभाऊ पटारे, गोिवद वाबळे, प्रताप पटारे, राजेंद्र थोरे आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी बुधवारी कानडे यांना पाठिंबा दिला. खासदार शेट्टी यांना हा मोठा धक्का मानला जातो.
पाण्याचा व विजेचा प्रश्न, कांद्याचे भाव, खंडक-यांचा प्रश्न आदीसाठी हा पाठिंबा दिल्याचे त्यांनी पत्रकात म्हटले आहे. राहुरीच्या चारदोन कार्यकर्त्यांनी स्वाभिमानीच्या जागेवर अतिक्रमण केलेल्या वाकचौरे यांना पाठिंबा दिला. पण ते अकोल्याचे आहेत. ते पाणीप्रश्नाबद्दल योग्य भूमिका घेण्याची शक्यता कमी असल्याने आम्ही पाठिंबा कानडे यांना देत असल्याचे त्यांनी पत्रकात म्हटले आहे. खासदार शेट्टींच्या संघटनेचे कार्यकर्ते आता दोघा उमेदवारांचा प्रचार करताना दिसणार आहेत.